होमगार्डची 12 ला सदस्य नोंदणी :होमगार्ड जिल्हा समादेशक विवेक पानसरे यांची माहिती

0
धुळे । दि.7। प्रतिनिधी-जिल्ह्यातील सर्व पथक व उपपथकातील 585 पुरुष व महिला होमगार्डची सदस्य नोंदणी दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार आहे, अशी माहिती होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली आहे.
सदस्य नोंदणीला पहाटे पाच वाजता सुरुवात होवून सकाळी 9.30 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. सदस्य नोंदणीसाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
20 ते 50 वर्ष वयोगटातील महिला व पुरुष होमगार्डसाठी नोंदणी करु शकतात. पुरुषाची उंची 165 तर महिलांची 150 सेंटीमिटर असणे आवश्यक आहे.

पुरुषांसाठी छाती न फुगवता 76 सेंमी व फुगवून 81 सेंमी असणे आवश्यक आहे. या अटी व शर्तींची पूर्तता करणार्‍या उमेदवारांची विहित वेळेत धावणे व गोळाफेक या शारीरिक चाचण्याही घेतल्या जाणार आहेत, असेही विवेक पानसरे यांनी सांगितले.

होमगार्ड सदस्यासाठी निवड झालेल्या उमेदवार हा वेतन सेवेत असेल तर त्याला वेतन सेवेत असल्याबाबत कार्यालयाचे अथवा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक असल्यास त्या संबंधी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, असेही विवेक पानसरे यांनी सांगितले.

होमगार्ड सदस्य नोंदणीबाबत माहिती पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पथकांमध्ये असलेल्या होमगार्डला सेवेतून काढण्यात येत आहे. यामुळे होमगार्ड संघातर्फे नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. होमगार्डला सेवेतून कमी करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला आहे.

 

LEAVE A REPLY

*