समितीचा वादग्रस्त दौरा; शौचालयाच्या कामांचा वेग मंदावला

0
धुळे । दि. 7 । प्रतिनिधी-जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत एक लाख 39 हजार वैयक्तिक शौचालये बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.
त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह पाणी स्वच्छता विभागाने वेळोवेळी बैठका घेऊन सरपंच ग्रामसेवकांना तंबी दित्यानंतर जुलैअखेर जिल्ह्यातून 42 हजार शौचालयांची नोंदणी झाली आहे.
शौचालयाचे उद्दिष्टपुर्ती न होण्यामागे पंचायत राज समितीची वादग्रस्त दौर्‍यामुळे शौचालयाच्या कामांचा वेग मंदावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री जिल्हा दौर्‍यावर आले असतांना जिल्हा दि.26 जानेवारी 2018 पर्यत हगणदारीमुक्त होईल असे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना दिला होता.

त्यामुळे जिल्हा परिषदेची यंत्रणा जोमाने कामाला लागली होती. मात्र गेल्या महिन्याभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पंचायत राज समिती जिल्हा दौरा जिल्हा परिषदेत दाखल झाला आणि अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. या पंचायत राज समितीच्या दौर्‍यात एका अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा बळी गेला.

त्यामुळे नाहक अधिकार्‍यासह विभाग प्रमुखांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. पंचायत राज समितीचा दौरा वादग्रस्त ठरल्याने शौचालयाच्या कामांकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाले.

त्यामुळे आता जिल्हा 26 जानेवारीपर्यंत हगणदारी मुक्त करण्याचे ध्येय कमी कालावधीत यंत्रणेला गाठावे लागणार आहे.

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा शंभर टक्के हगणदारी मुक्त करण्यासाठी अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची कानउघडणी केली होती.

सुरवातीली वैयक्तिक शौचालयांची माहिती घेवून तातडीने अहवाल सादर करण्याची ताकीद संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना दिली होती.

दीड महिन्यात डी.गंगाथरन यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी वेळोवेळी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या.

31 जुलैपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवकांनी ठरवून दिलेले शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पिच्छा पुरविण्यात आला.

जे ग्रामसेवक काम करत नाहीत त्यांच्यासह ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात आल्या. शौचालयांच्या कामांची गती वाढवून जिल्ह्याची हगणदारीमुक्तीकडे वाटचाल गतीने होण्यासाठी जून महिन्यात सीईओ गंगाथरन यांनी वैयक्तीक शौचालयांची माहिती घेवून तातडीने अहवाल सादर करण्याची ताकीद दिली होती.

त्यानंतर पाणी व स्वच्छता विभाग झपाटून कामाला लागला. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यात 31 जुलैपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवकांनी ठरवून दिलेले शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यामुळे शौचालयाची कामे वेगाने होवू लागली. त्याची ऑनलाईन नोंदणीही करण्यात आली. त्यानुसार ऑनलाईन शौचालयाची नोंदणी करण्यात धुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहचला.

शौचालयांची कामे पुर्ण व्हावीत. यासाठी स्वच्छता मिशन कक्षासह तालुकानिहाय गटसाधन केंद्राच्या कर्मचार्‍यांनी सुटीच्या दिवशीही कार्यालयात बसून कामे केलीत.

30 जूनपर्यंत 30 हजार शौचालयांची कामे पुर्ण करण्यात आली. पण जुलै महिन्यात कामांची गती मंदावल्याने केवळ 12 हजार शौचालयांची कामे झाली आहे. त्यामुळे कमी कालावधीत जिल्हा कसा हगणदारी मुक्त हाईल याकडे लक्ष लागुन आहे.

 

LEAVE A REPLY

*