मतदार नोंदणीसाठी जुलैत विशेष मोहीम

0
धुळे । दि.21 । प्रतिनिधी-भारत निवडणूक आयोगाने जे पात्र व प्रथम मतदार आहेत परंतु काही कारणाअभावी त्यांचा मतदार यादीत समावेश झालेला नाही अशा मतदारांचा मतदार यादीत समावेश करणेसाठी विशेष मतदार नोंदणी मोहिम 1 ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी म्हणाले की , ज्या युवक-युवतींचे दि. 1 जानेवारी, 2017 या अर्हता दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत अशा व्यक्तींना या मोहिमेत मतदार नोंदणी करता येणार आहे, तर अद्याप घरातील ज्या सदस्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशांना देखील मतदार यादीत नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत वयाचा दाखला, रहिवास पुरावा, 2 फोटो जोडावेत तर वयाच्या दाखल्यामध्ये जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, आधार कार्ड, महाविद्यालयाचे जन्मतारीख नमूद असलेले बोनाफाईड इ. ज्यावर जन्मतारीख नमूद आहे असे कागदपत्र सादर करावे तर रहिवास पुरावा म्हणून रहिवासी पत्ता नमूद असलेले वीज बिल अथवा दूरध्वनी बिल, पोस्टाचे पासबुक, पारपत्र, गॅस जोडणी कार्ड, घर नोंदणीबाबतची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मतदार नाव नोंदणीच्या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज पुरेशा प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले असून महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर लिंकवर देखील उपलब्ध आहेत. या नमुन्यांची प्रिंट काढून अर्ज म्हणूनही उपयोगात आणता येतील.

या मतदार नाव नोंदणीच्या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी नोंद घेऊन या मोहिमेचा अधिकाधिक पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*