दारु दुकान बंद करण्यासाठी सोनगीर येथील महिलांचा ‘एल्गार’

0
सोनगीर । दि.17 । वार्ताहर-येथील वार्ड क्रमांक चारमधील भरवस्तीतील देशी दारूचे दुकान बंद करावे किंवा अन्यत्र हटवावे यासाठी आज (ता. 17) येथील महिलांनी एल्गार पुकारला.
दारु दुकानासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. एका आठवड्यात दारू दुकान बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. महिलांचे निदर्शने पहाताच देशी दारू विक्रेत्याने दुकान बंद करून निघुन गेला.
दारूमुळे तरुण पिढी वाया जात असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. दारूमुळे गावातील एकता भंग पावत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी आत्महत्या केल्या आहेत.
दारूमुळे अनेकांची कुटुंबे बरबाद झाले आहेत. त्यामुळे हे दारू दुकान बंद झालेच पाहिजे असे उपस्थितांना सांगत हिंदू ,मुस्लीम महिला व पुरुषांच्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

दारू दुकान बंद न झाल्यास येथे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. कालच महिला व पुरुषांनी येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना निवेदन दिले.

भर वस्तीतील हे देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी आतापर्यंत 70हून अधिक निवेदने, अनेक वेळा ग्रामसभेचा ठराव, गेल्या 15 वर्षापासून अनेक आंदोलने, मोर्चा व तीनदा चौकशी होवूनही दारू दुकान हटलेच नाही.

या देशी दारू दुकानापासून अवघे दहा फुटांवर अंगणवाडी केंद्र आहे. समोरच महिला शौचालय आहे. आजूबाजूला सभ्य लोकांची वस्ती आहे. दारूड्यांचा मोटरसायकल लावण्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

महिलांना अश्लील हावभाव, भांडण, गलिच्छ शिवीगाळ हे नित्याचे आहे. वादविवादामुळे भांडण वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून महामार्गापासून 220 मीटरच्या आत हे दारू दुकान आहे. येथे सर्रास आदेशाची पायमल्ली होत आहे.

आज दुपारी चारला महिला दारू दुकानासमोर जमल्या. गर्दी पहाताच चालक कुलुप लावून पसार झाला.

भर वस्तीतील हे देशी दारूचे दुकान बंद करावे किंवा अन्यत्र हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.

यावेळी पंचायत समिती सदस्या रुपाली माळी, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा शकुंतला चौधरी, सदस्या प्रतिभा लोहार, जयश्री लोहार, डॉ. सीमा सोनवणे, प्रतिभा बागूल, कल्पना महाजनी, माजी ग्रामपंचायत सदस्य मुन्ना शेख, आरीफखाँ पठाण, हनीफ मिस्तरी, शिवसेनेचे दिनेश देवरे,इमरान शैख मुश्ताक खाटिक यूनुस खाटिक किशोर लोहार जितेंद्र बागूल हमीदाबी पठाण, शाहीन शेख व अनेक महिला उपस्थित होत्या.

 

 

LEAVE A REPLY

*