बाजार समितीतील भुईमूग खरेदी बंद

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-देशात नव्याने अस्तित्वात येत असलेल्या जीएसटीचे पडसाद अंमलबजावणीपूर्वीच उमटू लागले आहेत.
तेलबियांवर जीएसटी लागल्याने व्यापार्‍यांनी दि.1 जुलैपासून भुईमूग शेंगाची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजार समितीतील शेंगांची खरेदी-विक्री बंद राहणार असल्याने शेतकर्‍यांनी सदर माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे यांनी केले आहे.
सरकारने शेतमालावर जीएसटी लावलेला नाही. मात्र, तेलबियांसारख्या उत्पादनावर प्रक्रिया झाल्यानंतर तयार होणार्‍या मालावर जीएसटी लागणार आहे.

यामुळे ऑईल कंपन्या आणि व्यापारी संभ्रमात असून या कराची आकारणी कोणाकडून होईल याचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

शेतकर्‍यांकडून जीएसटीची आकारणी होणार नाही. त्यामुळे तेलबियांची खरेदी करणारा अथवा आडतदार यांना याचा फटका बसू शकतो.

हा कर लागणार असेल तर तो वसुल करावा कोणाकडून याबाबत चित्र स्पष्ट होईपर्यंत मार्केट कमेटीत भुईमूग शेंगाची खरेदी केली जाणार नाही, अशी भूमिका बाजार समितीने घेतली आहे.

व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार तेलबियांबाबत सगळ्याच बाजार समित्यांमध्ये व्यापार्‍यांनी ही भूमिका घेतली आहे. आळसी, सरकी, तीळ, भुईमूग शेंगा, एरंडी यांचा तेलबिया प्रकारात समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या भुईमूगाच्या शेंगांची विक्री होत आहे. धुळे बाजार समितीत रोज 300 ते 400 क्विंटल शेंगाची विक्री होत असते.

मात्र, तेलबियांना आता जीएसटीचा फटका बसला असून ही खरेदी कधी सुरु होईल याबाबतचे चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे मार्केट कमेटीने पुढील सूचना येईपर्यंत शेंगांची खरेदी-विक्री बंद असल्याचे कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

*