पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्री भेटीची प्रतीक्षाच

0

नाशिक | दि. १० प्रतिनिधी- जिल्हा बँकेच्या खालावलेल्या अर्थकारणाची माहिती देण्यासाठी आणि शासनाकडून मदत मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असलेल्या जिल्हा बँक पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांची भेट ही दिवास्वप्नच ठरत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रयत्नशील पदाधिकार्‍यांमध्येही फाटाफूट झाली आहे.
जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा करण्याची वेळ आली तरी वसुली अत्यल्प झाल्याने जिल्हा बँकेवर पीककर्ज वाटपाला आखडता हात घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बँकेला टाळे ठोकण्याचे आंदोलन केले होते.

त्याचबरोबर बँकेवर आर्थिक व्यवहारांमुळे अवलंबून असलेल्या इतर पतसंस्था, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण यांनाही बँकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा फटका बसला आहे.

त्यामुळे जिल्ह बँकेसमोर एक तर शासनाकडून कर्ज मिळवण्याचा पर्याय अवलंबणे किंवा सुमारे ३२०० कोटींची थकबाकी वसुली सक्तीने करून तिजोरीत भर घालणे हाच एक पर्याय समोर असल्याचे चित्र आहे.

वसुली होत नसल्याने शासनाकडून मदत घेऊन बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत करणे हा पर्याय विद्यमान पदाधिकार्‍यांना वाटत असल्याने ते वारंवार शासनाकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र बँकेची आर्थिक पत आणि कामकाजात अनियमितता याचे कारण सहकार विभागाने शासनाला कळवल्याने शासनाने जिल्हा बँकेला मदत करण्यास आखडता हात घेतला आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष, काही संचालक यांनी मिळून पालकमंत्र्यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची गळ घातली होती. या मागणीला १५ दिवस उलटून गेले तरी पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे पदाधिकारी वैतागून गेले आहेत. यातील काही संचालकांनी मुख्यमंत्री भेटीचा नाद सोडून दिला आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांतही फाटाफूट पडल्याचे चित्र आहे.

राजीनामे देण्याची टूम
जिल्हा बँकेचा आर्थिक कारभार हाताबाहेर गेल्याने आणि पीककर्जासह इतर ठेवीदार, खातेदारांनीही नाकी नऊ आणल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह इतर संचालकांनीही आता आमचे राजीनामे घ्या; पण जिल्हा बँकेला सावरा, अशी हाकाटी पिटण्यास सुरुवात केली आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव आणण्याची वेळ आली असताना त्यावेळी अध्यक्ष आणि काही संचालकांनी आपसात तडजोड करून आपापली पदे राखण्यासाठी जिवाचे रान केले होते. सध्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन ठेवल्याचे बोलले जाते. मात्र कार्यकारिणी मंडळ तो राजीनामा स्वीकारत नाही. प्रत्येक जण अध्यक्ष पदाची माळ आपल्या गळयात नको म्हणून या पदापासून चार हात दूर राहण्याचे पसंत करताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

*