राज्य महामार्ग नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचा ठराव रद्द करा

0
14 नगरसेवक व दारूबंदी आंदोलनाची मागणी
अकोले (प्रतिनिधी) – राज्य महामार्ग नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचा ठराव अकोले नगरपंचायतीला रद्द करणे सहज शक्य असतानाही जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाच्या नावाखाली नगराध्यक्षांनी टाळाटाळ केली असल्याच्या आरोप करत 14 नगरसेवकांनी ठराव रद्द करावा यासाठीचे निवेदन दिले आहे. निवेदनाच्या आधारे 29 जूनच्या बैठकीत हा ठराव रद्द करावा अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे.
दारुबंदी आंदोलनाच्यावतीने सांगण्यात आले आहे की, जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन नगरपंचायतीला मिळाले असेल, आता कोणतीही सबब न सांगता ठराव रद्द करण्यात नगराध्यक्ष पुढाकार घेतील अशी आम्ही आशा करतो. ही टाळाटाळ उघड करून जनभावनेचा आदर करीत ज्या 14 नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेवून रस्ता वर्ग करण्याला विरोध केला त्यांचे दारूबंदी आंदोलन जाहीरपणे अभिनंदन करीत आहे. त्याचबरोबर प्रमोद मंडलिक या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी यांना 308 कलमाखाली हा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला त्यांचेही अभिनंदन करीत आहे
एकीकडे ठराव रद्द करण्याची ही टाळाटाळ सुरू असताना दुसरीकडे दारूविक्रेते मंत्रालयापर्यंत रस्ता वर्ग करण्याचे प्रयत्न करीत आहेत. 29 जूनच्या बैठकीत ठराव रद्द न झाल्यास दारूविक्रेत्यांच्या सोयीसाठीच ही टाळाटाळ सुरू असल्याचा अर्थ अकोल्यातील नागरिक घेतील हे नगरपंचायतीने लक्षात घ्यावे.
रस्तावर्गला पाठिंबा देणारे नगरसेवक, नगरसेविका व बाहेरून राजकारण करणारे स्वयंघोषित चाणक्य यांनी थेट जनतेसमोर येवून गावाला दारूदुकाने का गरजेची आहेत? तरुणपिढीचे त्यात कसे कल्याण आहे? हे जाहीरपणे पटवून द्यावे. दारू दुकाने उघडण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले नाही हे लक्षात घ्यावे.
या बैठकीत राज्य महामार्ग नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचा ठराव सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजूर करून व्यसनमुक्त अकोल्यासाठी हातभार लावावा असे आवाहन दारुबंदी आंदोलनाचे दत्ता शेणकर, गौराम बिडवे, संतोष मूर्तडक व हेरंब कुलकर्णी आदींनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*