मुख्याधिकार्‍यांकडून बदनामीचा कट

त्र्यंबकेश्‍वर नगराध्यक्षांकडून कारवाईची मागणी

0
नाशिक | दि. २४ प्रतिनिधी- नगराध्यक्षांच्या पतीने प्रारूप विकास आराखड्यात अवैध प्रस्ताव घुसवल्या प्रकरणी त्र्यंबक नगराध्यक्षांना अपात्र ठरवावे, अशी शिफारस त्र्यंबक नगरपालिका मुख्याधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्षांना नोटीस बजावली असून आज नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी आपला लेखी खुलासा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. या प्रकरणी मुख्याधिकार्‍यांनी आपली बदनामी करण्याचे कारस्थान रचले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही याद्वारे देण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्‍वर पालिकेचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना नगराध्यक्षांचे पती दीपक लढ्ढा आणि नगरविकास विभागातील कर्मचार्‍यांनी संगनमताने सुमारे दीडशे एकर हिरव्या पट्ट्यातील जमीन पिवळ्या पट्ट्यात रूपांतरीत करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आणत मुख्याधिकारी चेतना केरूर यांनी त्यामुळे नगराध्यक्षांच्या पतीचा शासकीय कामात हस्तक्षेप बेकायदेशीर असून नगराध्यक्षांना अपात्र ठरावावे, अशी शिफारस जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

दरम्यान, नगराध्यक्षा रजेवर असताना झोन बदलाचा ठराव बनावट असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात झेरॉक्स नगराध्यक्षांवर कारवाईची मागणी नगरपरिषदेतील १३ नगरसेवकांनी केली आहे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. जिल्हा प्रशासनानेही यासंदर्भात त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.

त्यानुसार आज लढ्ढा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे खुलासा सादर केला आहे. यात त्यांनी मुख्याधिकार्‍यांवर आरोप केले आहेत. मुख्याधिकार्‍यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसून स्थानिक राजकारणाने प्रेरित होऊन त्यांनी मला अपात्र ठरवण्यासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग करून बनावट पुरावे रंगवण्याचा घाट घातला आहे. नगराध्यक्ष म्हणून मी माझे कर्तव्य चोखपणे बजावत असून माझ्या पतीने सदर प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केेलेला नाही.

त्यामुळे माझ्या कुटुंबियांची बदनामी होत असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यातून देण्यात आला आहे. मुख्याधिकार्‍यांकडून आपल्या पदाचा दुरपयोग करून कागदपत्रात फेरफार करण्याचा संभव असल्याचा संशय यातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची बदली करण्याची मागणी लढ्ढा यांनी केली आहे.

मुख्याधिकार्‍यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करून त्यांची चौकशी करून त्यांना अपात्र ठरवण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यासंदर्भात आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*