कोपरगावच्या साठवण तलावाचे काम सुरू करा : आशुतोष काळेंचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

0
कोपरगाव (प्रतिनिधी)- जायकवाडी धरण 100 टक्के भरलेले आहे. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी धरणेही आज मितीला तुडूंब भरलेली असूनही चार नंबर साठवण तलावाचे काम अपूर्ण असल्यामुळे शहरातील नागरिकांना पाच दिवसांनी पाणी मिळते. नागरिकांना नियमितपणे पाणी मिळण्यासाठी चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करावे असे साकडे युवा नेते आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना घातले.
कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस वाढत असलेला विस्तार व वाढणारी लोकसंख्या याचा विचार करता कोपरगावच्या नागरिकांना पाणीपुरवठा करणारे साठवण तलाव भविष्यात नागरिकांची तहान भागवू शकणार नाहीत. अशी दूरदृष्टी असणारे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतानाही कोपरगावच्या नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी शहराच्या पाणी साठवण तलाव क्रमांक चार साठी मोठ्या कष्टाने सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता.
या साठवण तलावाचे कामही सुरू झाले होते. परंतु 2015 साली या साठवण तलावाचे काम हे चौकशीच्या फेर्‍यात अडकले होते. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश देऊन दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु आजतागायत ही चौकशी पूर्ण झाली नाही व साठवण तलावाचे काम आजही बंद आहे.
युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच आवाज उठविला आहे. या तलावाचे काम मार्गी लागावे यासाठी आंदोलन व सहा महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले आहे. तरीही आजपर्यंत या साठवण तलावाचे काम सुरू झालेले नाही. माजी आमदार अशोकराव काळे यांनी साठवण तलावासाठी मोठ्या कष्टाने मिळविलेला निधी पडून आहे.
याची दखल घेत युवा नेते आशुतोष काळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेऊन शिल्लक असलेल्या निधीमध्ये अधिकची भर घालून तातडीने चार नंबर साठवण तलावाचे काम सुरू करावे असे साकडे घातले. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माहिती घेऊन चार नंबर साठवण तलावाचे काम लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासन युवा नेते आशुतोष काळे यांना दिले आहे.
यावेळी विजयराव आढाव, नगरसेवक संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, सुनील शिलेदार, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हिरामण कहार, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*