थकीत कर्जप्रकरण ; लोहे यांना एक वर्ष तुरुंगवास

0

कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर जिल्हा व सत्र न्यायालयाचे शिक्कामोेर्तब

संगमनेर (प्रतिनिधी) – थकीत कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने शहरातील प्रसिद्ध व्यापारी बद्रिनारायण लक्ष्मीनारायण लोहे यांना झालेली एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा संगमनेरच्या वरिष्ठ न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यांनी शारदा नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. या खटल्यात संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली होती, त्यावर त्यांनी दाखल केलेले अपील ङ्गेटाळत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.

बद्रिनारायण लोहे यांनी शारदा नागरी सहकारी पतसंस्थेकडून पाच वर्षे मुदतीचे कर्ज घेतले होते. मात्र ठरल्या वेळेत ते कर्ज ङ्गेडण्यास ते असमर्थ ठरल्याने संस्थेने नोटीस बजावून त्यांना कर्ज भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 6 एप्रिल 1999 साली संस्थेला नऊ लाख 22 हजार 355 रुपयांचा बँक ऑङ्ग बडोदाचा धनादेश दिला होता. मात्र संस्थेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 7 एप्रिल 1999 राजी हा धनादेश बँकेत भरला असता त्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम नसल्याने तो न वटताच माघारी आला.

त्यानंतर 15 एप्रिल 1999 रोजी संस्थेने अ‍ॅड. राजेश भुतडा यांच्यामार्ङ्गत कर्जदाराला नोटीस बजावून थकीत बाकी भरण्यास सांगितले. मात्र त्या नंतरही त्यांनी कोणतीही हालचाल न केल्याने अखेर संस्थेने थकीत कर्जदार बद्रिनारायण लक्ष्मीनारायण लोहे यांच्या विरोधात संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल केला.

त्यावर सविस्तर सुनावणी होऊन न्यायालयाने 3 नोव्हेंबर 2007 पूर्वी थकीत कर्जापोटी व्याजासह 23 लाख 32 हजार 421 एकरकमी न भरल्यास त्यांना एक वर्षे साध्या तुरुंगवास व 2500 रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कैदेची शिक्षा सुनावली होती. या विरोधात त्यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावरील सुनावणी पूर्ण होऊन न्यायमूर्ती संजीव शर्मा यांनी बद्रिनारायण लोहे यांना दोषी धरून प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयाने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*