श्रीगोंद्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड

0

अनेक गुन्ह्यांची दिली कबुली; सात जण अटकेत, तीन पसार

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यासह परिसरातील तालुक्यांत दरोडे टाकणारी दहा जणांची टोळी पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला पाहून तीन जण पसार झाले तर सात जणांना पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
यामध्ये श्रीगोंदा, पारनेर, मंचर, कर्जत येथील आरोपींचा समावेश असून या टोळीने आतापर्यंत श्रीगोंदा, कर्जत, पारनेर आदी ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी मोक्कामधील असून त्याच्यावर लोणावळा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सोमवार 6 रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पो. नि. बाजीराव पोवार, सपोनि. निलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, पो. हे. कॉ. अंकुश ढवळे, पो. कॉ. प्रकाश वाघ, राऊत, किरण बोराडे, रवी जाधव, अविनाश ढेरे, आजबे, खामकर तसेच कर्जत विभाग मोबाईल सेल प्रमोद जाधव, अकबर पठाण यांचे पथक तालुक्यातील पिसोरेखांड येथे कोंबिंग ऑपरेशन करणे करिता मांडवगणकडे जात असताना बातमीदारामार्फत महांडुळवाडी गावच्या शिवारात वलघुड ते खांडगाव रोडवरील हॉटेल यशोदाच्या पाठीमागे काही इसम शेतात संशयितरित्या वावरत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही अंतरावर वाहने लावून शिवारातील शेतात सापळा रचून छापा टाकला. हा छापा टाकला असता शेतात दहा जण लपून बसलेले होते. पोलीस आल्याचे पाहून यातील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर पोलिसांनी सात जणांना पकडले.
पकडलेल्या सात जणांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची व पळून गेलेल्यांची नावे सांगितली. यामध्ये अनिल पंडित भोसले (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), शाहरुख आरकास काळे (रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर), आवेश टुक्या भोसले (रा. रांजणगाव थेरपाळ, ता. पारनेर), सचिन ऊर्फ म्हैसूर अहिल्या काळे (रा. खडकी, ता. दौंड), विनोद सिद्धीकर चव्हाण (रा. गुंडेगाव, ता. अ. नगर), परश्या गौतम काळे (रा. देऊळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा), पावल्या कैलास काळे (रा. कडूस, ता. पारनेर), शरद कैलास काळे (रा. कडूस, ता. पारनेर), तुषार कैलास काळे (रा. कडूस, ता. पारनेर) असे आरोपी होते.
सात जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी हिरडगाव, कोकणगाव येथे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पहाटे केलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या चोरीच्यावेळी चार जणांना मारहाण करून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची कबुलीही दिली. तसेच श्रीगोंदा शहरातील हनुमाननगर भागात 81 हजार रुपयाची चोरी, साईनगर भागात 4 लाख 98 हजार रुपयाची चोरी, बनकर मळा येथून 2 लाख 5 हजार 800 रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली.
खेतमाळीस मळा येथे कुत्रे भुंकले म्हणून बाहेर आलेल्या दोन जणांना मारहाण करून जखमी केलेली घटना, शहरातील तहसीलदार, वकील, न्यायालय कर्मचारी यांच्या घरफोड्यांची कबुली, घोगरगाव येथील 2 लाख रुपयांची घरफोडी, लोणी व्यंकनाथ गावातील वृद्ध महिला, पुरुषाला मारहाण, गावातील वीस हजार रुपयांची चोरी, 45 हजार रुपये चोरी अशा अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघड होणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले. या सर्व आरोपींवर दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि. निलेश कांबळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*