दाजीकाका गाडगीळ एकांकीका करंडक

0

अहमदनगर(प्रतिनिधी)- पीएनजी ज्वेलर्सतर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. हा करंडक स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येत आहे. दाजीकाका गाडगीळ यांनी नेहमीच कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील स्पर्धक यामध्ये भाग घेऊ शकतात. यास्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या प्रवेशिका पीएनजी ज्वेलर्सच्या पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद आणि गोवा येथील सर्व दालनांमध्ये 5 ऑगस्ट 2017 पासून उपलब्ध असतील.
दाजीकाका गाडगीळ करंडक हा पीएनजी ज्वेलर्स, पायनापल एक्सप्रेेशन्स स्टुडिओ आणि मैत्री प्रॉडक्शन्स यांच्या सहाकार्याने होणार असून याची संकल्पना चित्रपट निर्माते अजय नाईक यांची आहे. रंगभूमीवरील प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले हे या उपक्रमासाठी चिफ मेंटर (मार्गदर्शक)असणार आहेत. विविध विषयांना सादर करून कलाकारातील कल्पकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही स्पर्धा लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांना चित्रपट, नाटक व टेलिव्हिजन या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेशासाठीचे व्यासपीठ ठरणार आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरी 11 ते 21 सप्टेंबर दरम्यान पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि गोवा याठिकाणी होणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात 25 व 26 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या शहरातील सर्वोत्कृष्ट संघ परीक्षकांद्वारे निवडले जातील. परीक्षकांमध्ये एक लेखक,एक दिग्दर्शक,एक कलाकार (महिला व पुरूष), एकनिर्माता, एक कला दिग्दर्शक व एक प्रकाश संयोजक यांचा समावेश असेल. प्रत्येक श्रेणीत 3 विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास एक लाख रूपये, द्वितीय क्रमांकास रूपये 75,000 आणि तृतीय क्रमांकास रूपये 51,000 व 2 उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी 10,000 रूपये देण्यात येतील. अंतिम विजेत्याला दाजीकाकागाडगीळ करंडक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पीएनजी ज्वेलर्सचा हा उपक्रम सर्वत्र पोहचेल. तसेच ब्रँडची परंपरा, विश्‍वासार्हता व गुणवत्ता या गुणांशी सुसंगत अशा क्वालिटी थिएटर संकल्पनेला याद्वारे प्रोत्साहन मिळेल.

LEAVE A REPLY

*