शेवगावच्या आरोपीस पोलीस कोठडी

0
मी अल्पवयीन आहे : एका आरोपीचा दावा
अहमदनगर, शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव शहरातील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्यासह चार जणांची हत्या करणार्‍या दोघा आरोपींना सोमवारी (दि.26) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील एका आरोपीने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यास 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी तर अल्ताफ छगन भोसले यास 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेतील अल्पवयीन आरोपीला वयाचे पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
शेवगावमधील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्यासह त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल व मुलगा मकरंद यांची हत्या झाल्याची घटना रविवार दि. 18 रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यातील एकास पोलीस कोठडी सुनावली असून दुसर्‍या आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला आहे.
त्यामुळे ऐनवेळी आरोपीने आपली बाजू मांडल्यामुळे पोलीस देखील पेचात पडले होते. आरोपी हा धडधाकट असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे तो फसवणूक करीत असल्याचा संशय होता. मात्र न्यायालयाने आरोपीची बाजू लक्षात घेऊन त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर या आरोपीच्या वयाचा कायदेशीर पुरावा दोन दिवसांत न्यायालयात सादर करावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याची कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली होती. हा सराईत आरोपी खरोखर अल्पवयीन आहे की नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरा आरोपी अल्ताफ भोसले याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. ही घटना कशी केली, हरवणे कुुंटुंबाची हत्या करण्याचे कारण काय आहे, गुन्ह्यात आणखी कोणती हत्यारे वापरली आहेत. घरातून चोरी केलेला मुद्देमाल कोठे आहे. आरोपींना मदत करणार्‍या आरोपींचा शोध घेणे आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल आहेत का, आरोपींच्या घराची झडती घेणे आहे. अशी अनेक माहिती घेणे आहे असा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे पुढील तपासासाठी न्यायालयाने भोसले यास दि. 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

चाकू व कटावणी हस्तगत – 
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या पथकाला अल्ताफ भोसले याने घटनास्थळा शेजारी असलेल्या एका पडक्या घरातून चाकू काढून दिला आहे. तर अल्पवयीन आरोपीने तो रहात असलेल्या दिघी येथील राहत्या झोपडीतून हत्याकांडासाठी वापरलेली लोखंडी कटावणी काढून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेतील अन्य पसार असलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींनी घरातून चोरून नेलेला सोन्या चांदीचा मुद्देमाल अद्याप हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आलेले नाही. अन्य आरोपी अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा आणखी उलगडा होणार आहे.

सर्व आरोपी नेवाशाचे – 
हरवणे हत्याकांडातील सर्व आरोपी हे नेवाशाचे आहे. इतकेच काय तर पोलिसांवर गोळीबार करुन जीवघेणा हल्ला करणारे सहा आरोपी देखील नेवाशाचे आहेत. पोलिसांच्या ताब्यातून सटकलेले आरोपी महाराष्ट्रात विविध ठिकाणी दरोडे टाकणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यातील एकावर तीन ते चार खुनाचे गुन्हे व दरोडे दाखल आहेत. असे आरोपी नेवाशात वास्तव्य करतात याची चुणूक देखील स्थानिक पोलिसांनी लागत नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

*