डॉक्टर तुम्हीही !

0

देशदूत डिजीटल

जिल्हा शासकीय रुग्णालयात स्त्रीभ्रूण हत्या आणि बेकायदा गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आले.
या प्रकरणात प्रथम सारवासारवीची भूमिका घेणार्‍या प्रशासनाने नंतर मात्र संबंधित डॉक्टरवर कारवाईचे हत्यार उपसले.

एकट्या डॉ. वर्षा लहाडेच या प्रकरणाला जबाबदार असतील असे धरून चालणार नाही. सरकारी खात्यात काम करताना एकट्याच्या जिवावर इतके गंभीर प्रकरण होत असतील यावर कोणाचाही विश्‍वास बसणार नाही.

जिल्हा शासकीय रुग्णालयात उमलत्या कळीला खुडण्याचे, स्त्रीभ्रूण हत्येचे, बेकायदा गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आले आहे. यामागे एका महिला डॉक्टरचाच हात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. स्त्रीच स्त्रीचा शत्रू असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.

निमित्त कोणतेही असो, स्त्रीभू्रण हत्या करू नका असे घसा फोडून जगाला सांगणारे काही डॉक्टरच यामध्ये आघाडीवर असावेत का? आणि इतर काही डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी आटापिटा करताना दिसावेत का? असे झाल्यावर कसा विश्‍वास ठेवायचा कोणावर? हे चित्र पाहता अखेर खेदाने म्हणावे लागते, डॉक्टर तुम्हीही! त्यापैकीच एक…!

जिल्हा रुग्णालयात उघडकीस आलेल्या स्त्रीभू्रण हत्येच्या रॅकेटने मागील पूर्ण आठवडा जिल्हा ढवळून निघाला. या घटनेपूर्वी काही दिवस आधी शहरातील शिंदे या खासगी डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा मारल्यानंतर तेथेही स्त्रीभू्रण हत्येचा सर्रास खुला बाजार चालल्याचे उघडकीस आले होते.

ओझर येथे मोठे रुग्णालय व आसपासच्या भागात ख्यातीप्राप्त असलेले हे डॉक्टर महाशय असा काही प्रकार करत असतील याच्यावर अनेकांचा विश्‍वास बसत नव्हता. पैशाच्या हव्यासापायी मंडळी कुठल्या थराला जातात याचे हे उदाहरण म्हणता येईल. असे करणारे आणि कारभार उघड झालेले शिंदे एकमेव असतील का? अशा अनेक शिंदेचे उद्योग राज्यभर सुरू आहेत.

तिथपर्यंत शासन पोहचू शकले नाही असे म्हणावे की अशा उद्योगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असावे? डॉ. शिंदेंवर गुन्हा दाखल झाला. न्यायालयीन कोठडीमुळे त्यांची तुरुंगात रवानगी झाली. पण निवाडा होण्यापूर्वीच डॉ. शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे या प्रकरणाचा तपास अगर पुढील रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकला नाही.

प्रकरण घडल्याच्या काही काळानंतर डॉक्टर मंडळींचे आंदोलन गाजले. डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील डॉक्टर मंडळी एकवटली होती. उच्च न्यायालयाचे आदेश व शासनाने दिलेल्या तंबीची तमा न बाळगता हे आंदोलन सुरू होते.

डॉक्टरांवर झालेले हल्ले कधीच समर्थनिय नाहीत. कारणे कितीही आणि काहीही असली तरी डॉक्टरांवरील हल्ले निषेधार्हच आहेत. परंतु पैशांसाठी काही डॉक्टरमंडळी आपल्या पेशाला काळिमा फासत आहेत हे जाणते डॉक्टरही नाकारू शकणार नाहीत. हे प्रकार कोणी एकच व्यक्ती करत नाही.

त्यासाठी ग्रामीण भागापासून शहरातील मोठ्या रुग्णालयात कार्यरत असलेली मोठी साखळी मदत करत असते. जिल्हा रुग्णालयात स्त्रीभू्रण हत्येचे आणि बेकायदा गर्भपाताचे रॅकेटही असेच बिनभोबाट सुरू होते. प्रसिद्धी माध्यमांनी घटना उचलून धरल्यानंतर व प्रत्यक्ष विधानसभेत यावर आवाज उठल्यावर आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी संबंधितांवर कडक कारवाईचे आश्‍वासन दिले.

या प्रकरणात प्रथम सारवासारवीची भूमिका घेणार्‍या प्रशासनाने नंतर मात्र संबंधित डॉक्टरवर कारवाईचे हत्यार उपसले. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने इतके दिवस दुर्लक्षित केलेले डॉ. लहाडेंच्या म्हसरूळ येथील प्रयाग रुग्णालयावर धाड टाकत कारवाईचा फार्स पूर्ण केला.

आता गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीस यंत्रणेला डॉ. लहाडेंचा पत्ता न लागणे हे सगळे लपवाछपवीचे खेळ असल्याचे संकेत मानले जावेत का? एरव्ही पोटच्या भूकेसाठी भाकरीचा तुकडा चोरला म्हणून गरिबाचे घरदार उचलून त्याला जेलमध्ये टाकणार्‍या पोलीस यंत्रणेला आठवडाभरापासून एक डॉक्टर महिला सापडू नये याचे आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

डॉक्टर सापडत नाही की अटकपूर्व जामीन मिळवून सर्व सोपस्कर पूर्ण होईपर्यंत पोलीस दुर्लक्ष करत असावेत का? यातील तथ्य समजण्याइतका समाज आता खुळा राहिलेला नाही. मुळात जिल्हा रुग्णालयात एक उमलती कळी खुडल्याचा प्रकार उघडकीस आला कसा, हेच रंजक आहे.

निफाडमधील उंबरखेड गावातील एक महिला खासगी हॉस्पिटलमधून मजल दरमजल करत सिव्हिलमध्ये गर्भपातासाठी आलीच कशी? हा प्रकार प्रत्यक्ष घडेपर्यंत कोणाच्याही लक्षात येऊ नये? आरोग्यक्षेत्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी असोत वा कर्मचारी, हे इतक्या बेपर्वाईने काम करतात का? या सर्व गोष्टींची कल्पना येथे काम करणार्‍या अधिकारी, सहयोगी डॉक्टर, कर्मचारी व या साखळीतील सर्वांनाच माहीत होती. परंतु काही पैशांच्या मोबदल्यात हेतुपूर्वक दुर्लक्ष करण्याचे प्रकार समाजात घडत असतात.

महापालिकेच्या ज्या आरोग्य विभागाने सामाजिक भान ठेवत हा प्रकार समोर आणला, त्या यंत्रणेलाही याची पूर्वीपासून कल्पना होती. परंतु माहिती होवूनही प्रत्यक्ष चौकशीला काही दिवसांचा काळ का जावा लागला याचे समर्पक उत्तर कदाचित यामधील कोणीही देऊ शकणार नाही. महापालिका आयुक्तांनी लक्ष घातल्याने खरा प्रकार उघड करावा लागला हे सत्य आहे.

जिल्हा रुग्णालयात यापूर्वी अशी किती प्रकरणे घडली असतील, त्यासाठी कोण जबाबदार असेल? एकट्या डॉ. वर्षा लहाडे या प्रकरणाला जबाबदार असतील असे धरून चालणार नाही. सरकारी खात्यात काम करताना एकट्याच्या जिवावर इतके गंभीर प्रकरण होत असतील यावर कोणाचाही विश्‍वास बसणार नाही.

थोडक्यात या प्रकरणाच्या मुळाशी जाणे भाग आहे. इतक्या संवेदनशील विषयाची कागदपत्रे तपासी पथकाला न देण्याची हिंमत होते कशी? कागदपत्रांची दडवादडवी का झाली वा कागदपत्रात काही गंभीर अनियमितता होती का याचा शोध घेतला जाणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्येचा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. मुलगी म्हणजे ओझे हा समज स्त्रीभ्रूण हत्येचे उगमस्थान असल्याचे लपून राहिले नाही. वंशाला दिवा म्हणून मुलाच्या अट्टहासापायी कोवळ्या कळी उमलण्यापूर्वीच खुडण्याचा क्रूरपणा दाखवला जात आहे.

असे प्रकार समाजात, प्रत्येक गावात, गल्लोगल्ली या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशा पद्धतीने सुरू आहे. असे प्रकार उघडकीस आले की साखळीतील एकमेकांनी एकमेकांना सावरायचे व नागरिकांनी असे घडले कसे याची खमंग चर्चा करून गप्प बसायचे हे चित्र आहे.

सर्वांना सुन्न करणारे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याविषयी महिला संघटना, सामाजिक संस्था, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणारे राजकीय पक्ष यापैकी कोणीही फारसे पुढे आले नाहीत हे दुर्दैव आहे.

  • खंडू जगताप, ८८०६०६४३५८

LEAVE A REPLY

*