Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक'गुन्हेगार दत्तक योजना' राबवणार

‘गुन्हेगार दत्तक योजना’ राबवणार

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

चेन स्नॅचिंग, रस्ता लूट, दरोडा, घरफोड्या आदी गुन्हे रोखण्यासाठी प्रतिकॉन्सटेबल एक गुन्हेगार याप्रमाणे ‘गुन्हेगार दत्तक योजना’ नाशिकसह परिक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याचे आदेश पोलीस अधिक्षकांना दिले जाणार आहे.

- Advertisement -

अवैध धंदे व गुटखा मुक्तीचा तर आपण विडाच उचलला असल्याचे स्पष्ट करत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी शेतकर्‍याचा मुलगा असल्याने फसविले गेलेल्या शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कसमादेचे भुमीपूत्र असलेल्या डॉ. प्रतापराव दिघावकर यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा येथील मराठा दरबार सभागृहात सर्वपक्षीय-सर्वधर्मीय नागरी सत्कार केला गेला. या सत्कारास उत्तर देतांना ते बोलत होते.

आयुष्यात अनेक सत्कार झाले, शाली मिळाल्या परंतू जन्मभूमीव्दारे झालेल्या या सत्कारात मिळालेली शाल मायेची ऊब देणारी असल्याने आपल्या जबाबदारीत अधिक वाढ झाली असल्याचे स्पष्ट करत डॉ. दिघावकर पुढे म्हणाले, मसगातील शिक्षणाव्दारे मालेगावशी जोडला गेलेला ऋणानुबंध आजही कायम आहे.

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास आपला देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. या दृष्टीकोनातून शेतकर्‍यांना फसविणार्‍या व्यापार्‍यांविरूध्द कारवाईचा बडगा आपण उगारला आहे.

नाशिक विभागात काम करण्याची संधी मिळताच शेतकरी फसवणुकीचा आढावा घेत पोलीस खाक्या दाखवून व्यापार्‍यांकडून 80 लाख रूपये शेतकर्‍यांना परत मिळवून दिले. आगामी काळात साडेतीन कोटी रूपये फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांची आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे सांगून डॉ. दिघावकर यांनी शेतातील कामे ते विशेष पोलीस महानिरीक्षकपदापर्यंतचा जीवनप्रवास यावेळी उलगडून दाखविला.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी डॉ. दिघावकरांच्या शेतकर्‍यांबद्दल असलेल्या कटीबध्दतेचे कौतुक केले. मातीचे ऋण ते विसरले नाहीत. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांविरूध्द आगामी काळात देखील कठोर कारवाई होत राहावी, अशी अपेक्षा ना. भुसे यांनी व्यक्त केली.

यावेळी मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, बंडुकाका बच्छाव, पवन ठाकरे आदींची डॉ. दिघावकरांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झालीत. सत्कार समितीचे संयोजक दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले.

संपुर्ण विश्वात कसमादेचा सुगंध शेतमालाव्दारे तसेच भुमीपूत्र डॉ. प्रतापराव दिघावकर यानी शेतकरी पूत्र ते पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत घेतलेल्या गरूड झेपेव्दारे पोहचला आहे.

पदाच्या माध्यमातून फसविले गेलेल्या शेतकर्‍यांना त्यांचा श्रमाचा पैसा ते परत मिळवून देत असल्याने ते कसमादे भुषण ठरले आहेत. मातीचे ऋण फेडणार्‍या या भुमीपूत्रास पाठबळ मिळावे यासाठीच सर्वपक्षीय-धर्मीय नागरी सत्कार करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी ना. भुसेंसह उपस्थित मान्यवरांतर्फे डॉ. दिघावकरांचा नागरी सत्कार केला गेला. सन्मानपत्राचे वाचन व सुत्रसंचालन पं.स. सदस्य आरूण पाटील यांनी केले.

कार्यक्रमास आ. मौलाना मुफ्ती, जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ.पो. अधिक्षक संदीप घुगे, उपमहापौर निलेश आहेर, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, डॉ. जयंत पवार, शांताराम लाठर, भिकन शेळके, नितीन पोफळे, सखाराम घोडके, अ‍ॅड. शिशिर हिरे, मदन गायकवाड, विवेक वारूळे, राजेंद्र लोंढे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या