अपहार केलेला 26 लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा हस्तगत; 7 अटक, 1 फरार

0
पंचवटी । विदेशी मद्यसाठा घेऊन जाणार्‍या मालट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून या मालट्रकमधील सुमारे 28 लाख 42 हजार रुपये किंमतीचे 376 विदेशी दारुबॉक्सचे अपहार केल्याप्रकरणी पंधरा दिवसापूर्वी आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणातील 26 लाख रुपये किमतीचे 352 विदेशी दारुचे बॉक्स हस्तगत करण्यात आडगांव पोलिसांना यश आले असून या प्रकरणात अद्यापपर्यत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 1 संशयित फरार आहे.

विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या ट्रकचा मालक, चालक, क्लिनर यांच्यासह पंचवटीतील वाल्मिकनगरमधील प्रमुख संशयिताचा यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या संशयितांनी यापूर्वीदेखील अश्याच प्रकारे विदेशी मद्यसाठ्याचा अपहार केल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने आडगांव पोलीस तपास करीत आहे.

या प्रकरणी विजय रामचंद्र कोठावले (वय 30, रा.श्रीरामनगर, जत्रा हॉटेल, आडगांव) यांनी गत पंधरा दिवसापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित पोपट नाथा बागुल (वय 35, रा.लोणी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद),

संदीप कारभारी गायकवाड (वय 27, रा.भिंगी बोरसर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद), शेख रऊफ शेख मोहम्मद(वय 40 रा.दर्गावेसजवळ, मशिदमधील ट्रस्टच्या खोलीत, औरंगाबाद), मामू उर्फ लतीफ अब्दुल कादीर शेख (वय 45, रा.सुसागर अपार्टमेंट, विनयनगर), विजय छगन राठोड (वय 38, रा.गंगाघाट, भाजीबाजार),

संजय विठ्ठल सोनवण े(वय 42, रा.गंगापूर गांव), बाळासाहेब शंकर तांबडे (वय 47, रा.नवनाथ नगर, पेठरोड) आदींना अटक करण्यात आली आहे. तर यातील प्रमूख संशयित संजय उर्फे बळी कांबळे (वाल्मिकनगर, पंचवटी) हा अद्याप फरार आहे.

तक्रारदार विजय कोठावले यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांना शहरातील मानसी लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेद्र शेरसिंह मडलोई यांनी दिंडोरी येथील परनॉड रकॉर्ट इंडिया प्रा.लि या कंपनीमधून विदेशी दारुची मालाची नांदेड येथे डिलेव्हरी करायची असल्याने सोळा टन मालाची वाहतूक करण्याजोगा ओळखीचा ट्रक देण्याची मागणी केली होती.

त्या नुसार विजय कोठावले यांनी ट्रक चालक पोपट नाथा बागुल यास ट्रक क्र.एम.एच.18 एम.2028 या मालट्रक मध्ये दिंडोरी येथील कंपनीतून सुमारे 845 विदेशी दारुचे बॉक्स घेऊन जाण्यास सांगीतले. दरम्यान 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता विजय कोठावले यांनी ट्रकचालक पोपट बागुल यास फोन करून कुठे असल्याचे विचारले असता त्याने गाडी नांदेड मार्गावरील वाटूरजवळ बिघडली असल्याची माहिती दिली.

दरम्यान कोठावले यांना संशय आल्याने त्यांनी मानसी लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेद्र मडलोई यांना बरोबर घेत नांदेडकडे निघाले. दरम्यान नांदेडकडे जात असतांना त्यांना औरंगाबाद-जालना मार्गावरील केंधळी फाट्याजवळ हॉटेल साई प्रयाग जवळील रस्त्याच्या खाली एका खड्ड्यात मालट्रक उभा दिसला. यावेळी त्यांनी चालक बागुल यांस विचारल्याने त्याने गाडी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या खाली उतरल्याची माहिती दिली. यावेळी कोठावले यांनी मालट्रक मधील मद्याच्या साठा बघितला असता त्यांना एकूण 845 बॉक्स पैकी 376 बॉक्स कमी असल्याचे दिसून आले.

दरम्यान, या प्रकरणाचा आडगांव पोलिसांनी तपास करतांना प्रथम चालक बागुल व क्लिनर संदीप गायकवाड यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शेख रऊफ शेख मोहम्मद याच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे उघड झाल्याने त्याला देखील ताब्यात घेऊन त्याने एका आयशर टेम्पोत लपवून ठेवलेला विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणातील 26 लाख 24 हजार 160 रुपये किंमतीचे विदेशी दारुचे 352 बॉक्स आणि 2 लाख रुपये किंमतीचा आयशर मालट्रक असा एकूण 28 लाख 24 हजार 160 रुपयांच्या मुद्देमाल आडगांव पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पुजारी यांनी दिली. आडगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक काका पाटील, हवालदार मुनीर काझी, संजीव जाधव, दत्ता खुळे, पोलीस नाईक अनिल केदारे, यशवंत गागुंर्डे, मनोज खैरे, वैभव परदेशी, वैभव खांडेकर आदींनी ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*