धाडसी चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

0
डुबेरे | दि. २३ वार्ताहर- येथील पेशवेलेन मार्गावर भरवस्तीत असणार्‍या मेडिकलसह अन्य एका ठिकाणी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करुन अंदाजे ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गावातील वरची वेस भागात दामु बहिरु कुंदे यांच्या मालकीचे तुलसी मेडीकल आहे. सोमवारी रात्री १० वाजता ते नेहमीप्रमाणे मेडीकल बंद करुन घरी गेले होते. मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मेडीकलच्या दरवाजाची दोन्ही कुलूपे तोडून आत प्रवेश केला. उचकापाचक करुन गल्ल्यातील दहा-वीस रुपयांच्या नोटांसह अंदाजे ५ हजार रुपयांची चिल्लर चोरट्यांनी ताब्यात घेतला.

त्यानंतर डेल कंपनीचा लाल रंगाचा लॅपटॉप घेऊन चोरट्यांनी तेथून पोबारा केला. सकाळी ६ वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लोकनेते पतसंस्थेलगत असणार्‍या तलाठी कार्यालयाचे देखील चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुसर्‍या दरवाजाचे कुलूप तोडण्यात त्यांना अपयश आले. कुलूपाच्या जवळ कटावणी लावल्याच्या खूणा आढळून आल्या असून पतसंस्थाच फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असावा अशी चर्चा परिसरात होत आहे.
या चोर्‍यांची गावभर चर्चा होत असतांनाच सकाळी १० वाजेच्या सुमारास निवृत्ती शिवराम वारुंगसे यांच्या घरातही चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. श्रीमंत पतसंस्थेसमोर रामदास वाडेकर यांच्या घरात भाडेकरु म्हणून निवृत्ती शिवराम वारुंगसे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. नातेवाईकांचा लग्न समारंभ असल्याने पत्नी छाया ही सोनांबे येथे गेली होती. तर पेट्रोलपंपावर रात्रपाळीच्या कामावर निवृत्ती हे गेले होते.

घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. त्यापूर्वी शेजारील वाडेकर यांच्या घराला चोरट्यांनी बाहेरुन कडी लावून घेतली होती. वारुंगसे यांच्या घरातील सर्व सामानाची उचकापाचक करुन लाकडी शोकेसमधील २१ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याच्या रिंगा, चांदीच्या तोरड्या असा जवळपास ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. सकाळी १० वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, रस्त्याच्या बाजुने वाडेकर यांनी दुकानावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरट्यांच्या हालचालीचा प्रकार कैद झाला आहे. तसेच मेडीकलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये देखील चोरीचा प्रकार कैद झालेला आहे. बिगर नंबर प्लेटच्या तीन मोटारसायकलींवर आलेली सहा जणांची ही टोळी दिसत असून सर्व चोरटे २२-२५ वयोगटातील दिसत आहे.

चोरी करत असतांना सीसीटीव्हीत चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असून सीसीटीव्ही कॅमेरा दिसल्यानंतर चोरट्यांनी घाई-घाईने तोंडावर रुमाल बांधून आपला कार्यभाग उरकून तेथून पलायन केले आहे. पोलीसांनी चोरीच्या घटनांचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहाणी केली आहे. तर पुढील तपास एस. एस. आहिरे करीत आहे.

LEAVE A REPLY

*