गोरक्षकांवरील हल्ला प्रकरणी 45 जणांवर दंगलीचा गुन्हा

0

शहरात अतिरीक्त पोलीस बंदोबस्त तैनात

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – अवैधपणे गोवंशाची वाहतुक करणारा जनावरांचा टेम्पो पकडून दिल्याच्या कारणावरून पुणे येथील येथील गोरक्षकांवर जमावाने हल्ला केला होता. याप्रकरणी श्रीगोंद्यातील 40 ते 45 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीच्या प्रकारानंतर श्रीगोंदा शहरात तणावाचे वातावरण असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

श्रीगोंदा येथे गोवंशाचा टेम्पो पकडून दिल्याच्या कारणाने पुणे येथील 12 गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यासमोरच दगडाच्या साह्याने एका जमावाने हल्ला केला होता. यामध्ये सर्व गोरक्षक जखमी झाले होते. या हल्ला प्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अतिक कुरेशी, अण्णा भंगारवाला सय्यद,

तय्यब कुरेशी, नदीम कुरेशी, फिरोज कुरेशी, शब्बीर बेपारी, रमजू कुरेशी, मैनुद्दीन कुरेशी, तय्यब कुरेशी, काल्या कुरेशी, मुन्ना बेपारी, मुस्ताफ कुरेशी, नदीम कुरेशी, मुनाफ कुरेशी, बाबू कुरेशी, मोबिन कुरेशी (सर्व रा. श्रोगोंदा) व इतर कुरेशी समाजातील 40 ते 45 जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट, दरोडा तसेच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून दंगल पसरवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर शहरात आज आरसीपी पथकाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिवसभर श्रीगोंद्यात तळ ठोकून –  काल सायंकाळी गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली गेली असून आरोपीना अटक केल्याशिवाय श्रीगोंदा न सोडण्याचे आदेश आल्यामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील दिवसभर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.त्यांनी आरोपींना अटक करण्याबाबत पोलिसांना सूचना केल्या, तसेच काही पोलीस कर्मचार्‍याच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी होत्या त्यांना खडे बोल सुनावले. हल्यामध्ये जखमी झालेल्या गोरक्षकांवर उपचार केल्यानंतर मुळगावी पुणे येथे रवाना करण्यात आले.

LEAVE A REPLY

*