पतसंस्थांना भविष्यात कायम सहकार्य करणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील पतसंस्थांनी सर्वसामान्य नागरिकांना उभे करण्याचे काम केले आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी व शेड्युल्ड बँकांपेक्षाही पतसंस्थांचे काम चांगले आहे. केवळ अर्ध्या टक्क्यांवर पतसंस्था आज आर्थिक कारभार करीत आहेत. संचालक चांगले असले की संस्थाही चांगले काम करते. राज्यामध्ये अशा चांगले काम करणार्‍या अनेक पतसंस्था आहेत. म्हणून या पतसंस्थांना संरक्षण देऊन प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न व पाठपुरवठा करत आहेत. यासाठी पुण्यात पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बैठक घेतली. या बैठक़ीत पतसंस्थांचे सर्व प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याबरोबरच इतर काही महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. यासाठी काका कोयटे व वसंत लोढा यांनी यासाठी सातत्याने पाठपुरवठा केला. भविष्यात कायम पतसंस्थांना सहकार्य करुन जिथे-जिथे मदतीची गरज लागेल, तेथे-तेथे सहकार्य करू, तसेच लवकरच पतसंस्थांमार्फत प्रक्रिया उद्योग सुरु करण्यास मान्यता देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्यावतीने पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी व महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मिरजगाव येथील कार्यक्रमात सत्कार करुन आभार मानण्यात आले. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पतसंस्था सहकारी आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा, अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक शिवाजी कपाळे, स्वप्नील देसाई यांनी मंत्री सुभाष देशमुख यांचा विशेष सत्कार केला. पालकमंत्री ना. राम शिंदे व इतर विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काका कोयटे म्हणाले, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे जिथे जिथे शक्य होईल, तेथे तेथे पतसंस्थांच्या प्रलंबित प्रश्‍नांचा व तक्रारींचा पाढा कायम वाचत आलो आहे. मात्र आज खास त्यांचे अभिनंदन व आभार मानण्याकरिता आम्ही सर्वजण नगरहून मिरजगावला आलो आहोत. पतसंस्थाचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी मागच्या महिन्यात जिल्हास्तरीय पतसंस्था बंद आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाची दखल मंत्री सुभाष देशमुख यांनी घेऊन पतसंस्थांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीस पुण्यात पाचारण केले. एकाच बैठकीत पतसंस्थांचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे निर्णय घेतले गेले.

यावेळी पालकमंत्री ना. राम शिंदे म्हणाले, गरजूंना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम आज सर्वत्र पतसंस्थांमार्फतच होत आहे. एक मोठा आधार पतसंस्थांचा सर्वसामान्यांना आहे. सहकारी पतसंस्था आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. मंत्री सुभाष देशमुख यांनी नुकत्याच पुणे येथे झालेल्या बैठकीत पतसंस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत.

LEAVE A REPLY

*