नाशिक महापालिका कर्मचारी भरतीसाठी प्रशासन घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

महापालिकेत शनिवारी-रविवारी नियमित कामकाज 

0
नाशिक | दि.२५ प्रतिनिधी- नाशिक शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या जवळपास झाली असून सफाई कामगारांची संख्या तोकडी पडत आहे. शहर स्वच्छतेला कर्मचारी बळ कमी असल्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. तसेच गेल्या काही वर्षात दीड हजाराच्या वर अधिकारी व कामगार सेवानिवृत्त झाले असून गेल्या महापालिकेच्या दैनंदिन कामावर मोठा ताण पडत आहे.
यामुळे महापालिकेत सफाई कर्मचारी व कर्मचार्‍यांची सरळ भरती करावी, अशी मागणी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे प्रशासनाकडून केली जाणार आहे. येत्या रविवारी मुख्यमंत्री नाशिक दौर्‍यावर येत असून नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर ते महापालिका अधिकार्‍यांसोबत पहिली बैठक घेणार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शहर विकासाचे वेगाने निर्णय घेतले जाणार, अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.

याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौर्‍यात महापालिकेत होणार्‍या बैठकीची तयारी महापालिका प्रशासनाकडून वेगात सुरू आहे. या दौर्‍यानिमित्त आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सुटीचा चौथा शनिवार (दि.२७) व रविवार (दि.२८) महापालिकेच्या सुट्या रद्द केल्या आहेत. यासंदर्भात बुधवारी आयुक्तांनी परिपत्रक काढत यात ‘मुख्यमंत्र्यासोबत विभागाच्या बैठक व सादरीकरण करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी व रविवारी महापालिकेत नियमित कामकाज होणार आहे,’ असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी हे दोन सुट्यांना मुकणार आहेत.
रविवारी दुपारी १२ किंवा साडेबारा वाजता महापालिकेत मुख्यमंत्र्यांसमवेत अधिकार्‍यांची बैठक होणार आहे. बैठकीत नियोजित प्रकल्प व नवीन प्रकल्पांचे सादरीकरण होणार असून विद्यमान आर्थिक स्थितीची माहितीदेखील दिली जाणार आहे. या बैठकीनिमित्त महापालिका प्रशासनाकडून शहरातील विकासकामांना २ हजार कोटी रुपये मिळावेत म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे. यात शहरातील वेगवेगळ्या रस्ते विकासासाठी ८०० कोटी रु., किकवी धरणाकरिता ५०० कोटी रु. महापालिका आरक्षणातील शाळा, उद्यान आदी भूसंपादन, पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन व इतर कामांचा समावेश या निवेदनात राहणार आहे.

याच दरम्यान महापालिकेत तात्कालीन महापौर वसंत गिते यांच्या काळात कर्मचारी भरती झाल्यानंतर अद्यापही सरळ सेवा नोकर भरती झालेली नाही. गेल्या काही वर्षांत सुमारे दीड-दोन हजार अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यामुळे दैनंदिन कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचार्‍यांचीदेखील अद्याप भरती झालेली नसून लोकसंख्येच्या तुलनेत शहरात ४ हजाराच्या वर कर्मचार्‍यांची गरज असताना केवळ १४०० कर्मचारीच शहर स्वच्छतेचे काम करीत आहेत.

यामुळे शहरात अस्वच्छतेचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक महापालिकेचा क्रमांक १५१ आला आहे. शहराचा आरोग्याचा प्रश्‍न अधिक गंभीर बनू नये म्हणून सफाई कर्मचारी भरती आणि सरळ नोकर भरतीस मंजुरी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडून केली जाणार आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांकडे महापालिका प्रशासन मागणी करणार असले तरी त्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार जोर लावणार का याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*