मुख्यमंत्र्यांकडून राजळे कुटुंबीयांचे सांत्वन

0
पाथर्डी (प्रतिनिधी) – कोणत्याही माणसाशी सहजमैत्री करणारा व जगाचं ज्ञान आणि आत्मभान असणारा धैर्यवान मित्र आम्ही गमावला आहे. राजीव विधानसभेत सत्ताधारी असताना अर्थसंकल्प व विकासाच्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलायचा. मोनिका राजळेंच्या पाठीमागे भक्कमपणे शक्ती उभा करणारा राजीव माझाही जिवलग होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कासारपिंपळगाव येथे सिद्धसावली या आ. राजळे यांच्या निवासस्थानी माजी आ. कै. राजीव राजळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन सोमवारी रात्री 9 वाजता आले होते. माजी आमदार अप्पासाहेब राजळे, मोहिनी राजळे, आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, कृष्णा व कबीर यांचे सात्वन करीत आधाराचे दोन शब्द बोलून फडणवीस यांनी राजळे कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, राजीव राजळे व मी सोबत विधानभेत काम केले. धडाडीचा, उमदा आणि अभ्यासू राजीव हा मैफलप्रिय होता. प्रचंड वाचन असल्याने कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करताना तो सर्वांना हसवायचा देखील. इतरांना आनंद देणारा हा मित्र गमावला आहे. मोनिका राजळे यांच्या पाठीमागे राजीवची शक्ती होती. कोणत्याही कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्याची त्याची खासीयत होती.
अर्थशास्त्राबद्दल राजळे यांना चांगलं ज्ञान होतं. गरिबांचे प्रश्न शासन पातळीवर मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती मी जवळून अभ्यासली होती. राजळे गेल्याने माझा दिलदार मित्र गमावल्याची खंत आहे.परमेश्वर त्यांना चांगली जागा देईल असा मला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.
यावेळी डॉ. भागवत कराड, राजीव राजळेंचे पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर येथील अनेक सहकारी उपसस्थित होते. पोलीस प्रमुख डॉ.रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रांतअधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. दुपारी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जिल्हा पीरषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे व रात्री उशिरा मुख्यमंत्री गेल्यानंतर माजी मंत्री राजेश टोपे यांनी राजळे कुटुंबाचे सांत्वन केले.

 

LEAVE A REPLY

*