सीईओंच्या विलंबाने जि.प.धारेवर; विधानमंडळ आदीवासी कल्याण समितीने सुनावले खडेबोल

0
नाशिक । विधान मंडळाच्या अनुसूचीत जमाती कल्याण समितीला आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलंबाने आले. त्यामूळे समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांना प्रतिक्षा करावी लागली. यामुळे समितीने जिल्हा परिषदेला खडेबोल सुनावले.

त्यामूळे समितीने आज होणारा जि.प.चा आढावा उद्यावर (दि.30) ढकलला. आदिवासी कल्याण समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे सुरु असताना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला आदिवासी भागात केलेल्या कामांचा आढावा सादर करण्यासाठी समितीने निहीत वेळ दिलेली होती.

यावेळेत जि.प.चे अतिरिक्त सीईओ, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंते, शिक्षणाधिकारी, आरोग्यधिकारी, कृषी अधिकारी, लेखाधिकारी, पशूसंवर्धन अधिकारी यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. मात्र, सीईओ विलंबाने आले होते.

समिती अध्यक्षांनी सभागृहात जेव्हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला आढावा सादर करण्यासाठी पाचारण केले, तेव्हा सीईओ व्यतिरिक्त सर्व अधिकारी मध्ये गेले. सीईओ कुठे आहेत, अशी विचारणा समितीकडून झाली. तेव्हा जि.प.च्या अधिकार्‍यांना प्रशासन प्रमुखांच्या गैरहजरीबाबत काय उत्तर द्यावे ते कळेना, समितीला तब्बल 15 मिनिटे सीईओ दीपककुमार मीना यांची वाट पहावी लागली.

त्यामूळे समितीच्या सदस्य आमदार आणि अध्यक्षांचा पारा चढला. जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुख सीईओंकडून संपूर्ण समितीला वाट पहावी लागते, ही बाब समितीतील सदस्यांना रुचली नाही. त्यांनी तडक जेवनाची सुटी घेऊन जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना तुम्हाला जेव्हा बोलवण्यात येईल, तेव्हा समिती पुढे हजर व्हा, असे आदेश देऊन बाहेर काढले. नेमके त्याचवेळी सीईओ दीपककुमार मिना यांचे आगमण झाले आणि त्याचवेळी समिती अध्यक्षांसह सदस्य बाहेर पडले.

घाईगडबडीत सभागृहात आलेल्या सीईओंनी सभागृह खाली झाल्याचे पाहून अधिकार्‍यांना ‘क्या हूआ’ असे विचारणा केली. त्यावेळी त्यांना जि.प. अधिकार्‍यांकडून तुम्ही विलंबाने आल्याने समिती अध्यक्ष आणि सदस्य नाराज झाल्याचे सांगितले. समितीच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या जेवनापर्यत जिल्हा परिषदेचे सीईओ आणि अधिकारी सभागृहात बसून होते.

जेवनानंतर समिती पुन्हा आढाव्यासाठी सभागृहात हजर झाली. तेव्हा दिलेल्या वेळेत जिल्हा परिषदेचे सीईओच बैठकीला हजर होत नाही, तुम्हाला वेळेचे गांभिर्य नाही, असे म्हणून सीईओसहीत सर्व जि.प.अधिकार्‍यांना समिती अध्यक्ष आ. रुपेश म्हात्रे यांनी बाहेर काढले.

तुम्हाला जेव्हा बोलवणे होईल. तेव्हा सभागृहात या, असे म्हणून समितीने पुढील शासकीय विभागाच्या आढाव्याला सुरुवात केली होती. यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत सीईओसह सर्व अधिकार्‍यांना समितीच्या बोलवण्याची प्रतिक्षा करावी लागली. सीईओंना आपल्या विलंबामुळे मोठा पेच निर्माण झाल्याची चुकचुक लागून होती.

LEAVE A REPLY

*