सीसीटीव्हीच्या मदतीने हागणदारी मुक्तीला यश

0

समशेरपूर (वार्ताहर) – समशेरपूरमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही यश येत नसल्याने शेवटी ग्रामपंचायतीनेे उघड्यावर हागणदारी होणार्‍या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तरी काहींनी नेहमीप्रमाणे सकाळी अंधारात हजेरी लावली. त्यांना कॅमेर्‍याने कॅच केले. संबंधितांना ग्रामपंचायतीत बोलावून सीसीटीव्ही फुटेज दाखविले. यामुळे कॅमेर्‍याच्या नजरेचा लोकांनी चांगलाच धसका घेतला आणि मार्गावरील व बखळीतील हागणदारी बंद झाली.

या पूर्वी नदी किनार्‍यावर, स्मशानभूमी परिसर, रस्ते , बखळी व फडके वाडे येथे हागणदारी होत होती. जनतेला सांगून, प्रबोधन करून, ग्रामसभेत ठराव घेऊन उपयोग झाला नाही परंतु सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा प्रयोग यशस्वी ठरून, उघड्यावरील हागणदारीस चांगला आळा बसला.

उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दर कॅमेर्‍याच्या धसक्याने सार्वजनिक शौचालयांचा वापर करू लागले आहेत. ज्यांना स्वत:चे शौचालय नव्हते त्यांनी शौचालये बांधली तर नवीन शौचालय बांधणीची मागणी वाढली आहे. चालू वर्षी 250 नवीन शौचालये बांधणार असल्याची माहिती उपसरपंच सचिन दराडे यांनी दिली. आता गाव हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत असून स्वच्छतेला आपलेसे करीत आहे.

आढळा नदी काठावरील स्मशान भूमी, वास्तू, सुंदर व विशाल मुक्तीधाम, स्वच्छ हनुमान मंदिर परिसर यामुळे गावाच्या वैभवात भर पडून, सुंदरतेकडे वाटचाल करीत आहे.

सरपंच अनिता फोडसे, उपसरपंच सचिन दराडे, सदस्या मीराबाई दराडे, विलास भरीतकर, दत्तू माळी, सुरेखा मुखेकर, मीरा ढोन्नर, अनिता बर्डे, दिलीप पथवे, विलास जगताप, नानीबाई आगविले, सीताराम आगविले, खंडू मेंगाळ कचराबाई मेंगाळ, ग्रामविकास अधिकारी – आर. के. वर्पे आदींनी ग्रामविकासाठी स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागृती केली.

LEAVE A REPLY

*