कारच्या डिक्कीतून लांबवले १.७५ लाख; सिन्नर बस स्थानक पोलीस चौकीजवळील प्रकार 

0
सिन्नर : बसस्थानकाच्या आवारातील पोलीस चौकीजवळ उभ्या केलेल्या कारच्या चालक बाजूची काच फोडून व डिक्की उघडून १.७५ लाखांची रक्कम लांबवण्याचा प्रकार आज दुपारी १२.४५ सुमारास घडला.
शहरातील साई  नागरी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक कानवडे यांची ही रक्कम होती. कारचा हप्ता भरण्यासाठी आंध्र बँकेतून खात्यावरून रक्कम काढून त्यांनी आपल्या व्हेरिटो कार मध्ये ठेवली होती.
कानवडे हे झेरॉक्स काढण्यासाठी गेल्याचे निमित्त साधत अज्ञात चोरटयांनी डाव साधला. शहरातील बँकांचा परिसर सुरक्षित नसल्याचे आजच्या घटनेमुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.
बसस्थानक आवारातील आंध्र बँकेतून पैसे काढण्यासाठी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास उत्तम बापूसाहेब कानवडे रा. गंगोत्री नगर , शिवाजीनगर पाण्याची टाकीजवळ हे आपली चुलत बहीण कविता राजाराम हासे रा. कानडी मळा यांचेसोबत बँकेत गेले होते.
त्यांनी आपली   महिंद्रा व्हेरिटो कार  क्र. एम.एच. १५ ई.बी. ३९७३ बसस्थानकातील पोलीस चौकीमागे उभी केली होती. बहिणीकडे स्वतः जवळचे साडेतीन हजार रुपये देऊन दोघेही बँकेत गेले. तेथे होंडा कारचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी  १.७५ लाख रुपये काढले. ही रक्कम रेक्झिनच्या बॅगमध्ये ठेवून ते कारकडे आले.
सोबत असणारी बहीण तिच्या स्कुटीवरून निघून गेल्यावर कानवडे यांनी कारच्या डिक्कीत ठेवली. डिक्कीला लॉक करून ते समोरच असलेल्या झेरॉक्स सेंटर मध्ये रेशनकार्ड व पॅनकार्डची झेरॉक्स काढण्यासाठी गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरटयांनी चालकाच्या बाजूची काच फोडली.
तेथून पाठीमागील डिक्कीचे लॉक उघडून कानवडे यांनी ठेवलेली पैशांची बॅग व अन्य महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग लांबवली. दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कानवडे झेरॉक्स काढून परत आल्यावर त्यांना काच फुटलेल्या अवस्थेत आढळली.
शंका आल्याने त्यांनी डिक्की तपासली असता ती अर्धवट उघड्या अवस्थेत दिसली. डिक्की उघडल्यावर रक्कम गायब असल्याचे स्पष्ट झाले. रोख रकमेसह घराचे खरेदीखताचे कागदपत्र, आयटी रिटर्न फाईल, रो हाऊसचे कागदपत्र, बँकेचे पासबूक, अँटी करप्शन कमिटीचे ओळखपत्र, कायद्याची पुस्तके देखील चोरटयांनी लांबवल्याचे कानवडे यांनी म्हटले आहे.
याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटना घडल्यानंतर लागलीच धाव घेतली. पोलिसांनी नाकाबंदी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांचे कोणतेही वर्णन नसल्याने माग काढता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बसस्थानक परिसरात असणाऱ्या बँकांजवळून रोकड  घटना यापूर्वी  घडल्या आहेत.
हे प्रकार करणारे सराईत असून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू  शकत नसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बसस्थानकातील पोलीसचौकी केवळ शोभेसाठी बांधण्यात आली की काय अशी शंका असून आता तरी या चौकीत कायमस्वरूपी पोलीस नेमावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*