पर्यटन वृध्दीसाठी ब्रँडीग आवश्यक : झगडे

0
नाशिक । जिल्ह्याला नैसर्गिक संपन्नता लाभली आहे. त्यामूळे येथील पर्यटन वैशिष्ट्यांचे अधिकाधिक मार्केटिंग आणि ब्रँडीग करणे आवश्यक आहे. तिन्ही ऋतूत जिल्ह्यात आढळणारी वैशिष्ट्ये प्रभाविपणे जगासमोर नेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 5 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या ‘पर्यटन पर्व’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे , सहाय्यक वनसंरक्षक सुजीत निवसे, वाईन असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर, ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना झगडे म्हणाले, इतर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी मर्यादा असताना पर्यटन क्षेत्रातील संधी वाढत आहेत. या क्षेत्रात आपण मागे राहू नये यासाठी आपल्याकडील पर्यटनाचे मार्केटींग विदेशातील पर्यटन कार्यशाळा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून करण्यात यावे.

तसेच विशिष्ट पर्यटनस्थळांचे नियोजनबद्ध ब्रँडींग करण्यात यावे. पर्यटन क्षेत्रासाठी कमी गुंतवणूकीत अधिक उत्पन्नाची संधी असल्याने या क्षेत्राच्या विकासाकडे जिल्हास्तरावरदेखील अधिक लक्ष देण्यात यावे. पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी मुलभूत सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. देशाबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विभागातील स्थान वैशिष्ट्यांचा उपयोग करावा.

आदिवासी भागातील कलांना जागतिक स्तरावर नेल्यास या भागातील पर्यटन वाढून ग्रामीण जनतेलादेखील रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. म्हणाले, जिल्ह्यातील वातावरण , मुंबईची समिपता , पारंपरिक कला आणि ऐतिहासिक स्थळांमुळे नाशिकच्या पर्यटन विकासाला चांगली संधी आहे.

पर्यटकांना अधिकाधिक काळासाठी आकर्षित करण्यासाठी पर्यटन सर्कीट निर्माण करणे गरजेचे आहे. सामान्य पर्यटकांनादेखील पर्यटन करणे सुलभ होईल यादृष्टीने विचार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन अधिकारी मुंडावरे यांनी या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच पर्यटन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*