बोरगडला मिळाली हिरवी शाल; पर्यावरण समतोल राखण्याचा यशस्वी प्रयत्न

0
नाशिक (दिनेश सोनवणे) : नाशिकपासून 18 कि.मी. अंतरावर पेठरोडवर रामशेज किल्ल्यानजीक बोरगडचे हिरवेगार जंगल नजरेस पडते. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोन दिमाखदार डोंगर दिसतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अजिंक्य किल्ले रामशेज आणि दुसरा म्हणजे बोरगड.

या परिसराला निसर्गाची हिरवी शाल पांघरण्याचे काम वनविभाग, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनी आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी केले आहे. यामुळे खुललेल्या निर्सग सौंदर्याने सर्वांना मोहित केले आहे. मनुष्याने ठरवले तर कोठेही नंदनवन करू शकतो, हेच यातून दाखवून देण्याचे काम शासन, खासगी कंपनी आणि सामाजिक संस्थांनी केले आहे.

हा आदर्श इतरांनी घेतला तर सिमेंटच्या जंगलालगत हिरवा गालीचा उभारून पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो.
निसर्गावर प्रेम करणारे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे विश्वरूप राहा यांनी बोरगड येथील जंगलात सुमारे सव्वा लाखाहून अधिक झाडे लावून माळरानाचे जंगल उभारण्यास हातभार लावून मोठा आदर्श घडवला आहे.

एवढ्या मोठ्या जंगल उभारणीसाठी वनविभागाचे कर्मचारी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनी, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते आणि तुंगलदरामधील ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग आहे. सुरुवातीला झाडे लावल्यानंतर झाडाच्या मुळांशी पाण्याचे मडके ठेवण्यात आले. वणवा टाळण्यासाठी गवत लहान असताना कापणी करण्यात आली. जसजशी झाडे मोठी झाली, पाण्यासाठी टाक्या वर चढवण्यात आल्या, हिरवळ वाढली. पावसाळ्यात पाण्याचे झरे निर्माण झाले.

जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. कीटक, पक्षी, प्राणी, वनस्पती यांची रेलचेल येथे नियमित असते. यामुळे येथील जैवविविधता वाढली. नाशिकला आल्यानंतर अनेक पर्यटक या ठिकाणी भेट दिल्याशिवाय परत जात नाहीत.

मनाला मोहून टाकणारे आहे. नाशिकमधील अनेक संस्था या किल्ल्यांवर जाऊन श्रमदान करतात. त्यामुळे येथील स्वच्छता म्हणजे मोठा आदर्श आहे. दोन्ही डोंगरांच्या पायथ्याशी तुंगलदरा हे खेडेगाव आहे. महाराष्ट्रातील पहिले वनसंवर्धन राखीव क्षेत्र म्हणून बोरगडला 2008 मध्ये जाहीर केले.

नाशिकचा औद्योगिक विकास बघता महिंद्रसारख्या अनेक कंपन्यांनी बोरगडच्या विकासासाठी हात पुढे करत वृक्ष लागवडीचा वसा घेतला. त्यामुळे एका वेगळ्या उंचीवर बोरगडला नेऊन ठेवले आहे. शहरातील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीने घेतलेल्या पुढाकारामुळे बोरगड प्रकल्प महिंद्र हरियाली नावानेदेखील ओळखला जातो.

2007 मध्ये जंगल तयार करण्याच्या हेतूने सात वर्षांचा वृक्षारोपणाचा आराखडा तयार केला. या ठिकाणी सुमारे दीड ते दोन लाख झाडे लावण्यात आली आहेत. येथील झाडे टिकवण्यासाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. झाडांना पाणी देण्यासाठी गडावर ठिकठिकाणी टाक्या बसवण्यात आल्या. तुंगदरा येथील काही लोकांची निवड करून त्यांच्यावर पाणी देण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांना नेचर कॉन्झरर्वेशनच्या विश्वरूप राहा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होते.

राहा यांनी या सगळ्या अनुभवाने ‘बर्डज् ऑफ नाशिक डिस्ट्रीक्ट-ए कॉन्झर्वेशन गाईड’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात पक्ष्यांची मराठी माहितीदेखील आहे. यात नाशिक जिल्ह्यात दिसणार्‍या पक्ष्यांच्या एकूण 251 प्रजातींची सविस्तर माहिती आहे. प्रादेशिक वनखात्याचे अधिकारी अरविंद पाटील आणि के. प्रदीपा यांचे यात मोठे योगदान असून सुयोग्य नियोजनामुळेच आज इथल्या वातावरणात टिकतील अशी झाडे लावली आहेत.

साग, बांबू, शिसम, खैर, ऐर, अर्जुन, आपटा अशा वृक्षांची लागवड केली. भारतीय वायुसेनेचे रडार केंद्र याच ठिकाणी असल्यामळे त्यांनी या क्षेत्राला संरक्षण दिले आहे. त्यामुळे निसर्गाची नासधूस झालेली नसून येथील सौंदर्य टिकून आहे. साग, बांबू, आपटा, सादडा अशी आणि अनेक प्रकारची झाडे मन मोहून घेतात. कंदिलपुष्प नावाच्या दुर्मिळ वनस्पतीच्या आठपैकी तीन जाती या ठिकाणी आढळतात. तसेच सात वर्षांनी फुले देणारी कारवीदेखील येथे आढळते.

हे आहे बोरगडचे आकर्षण :  राखी वटवट्या, छोटा वटवट्या, जांभळा शिंजीर, लोटन शिंजीर, लाल बुडाचा बुलबुल, शेंडीवाला बुलबुल, पट्टेरी कबुतरे, तांबट, जंगल सातभाई, जंगल लावरी, वर्षा लावरी, टकाचोर, लाल डोक्याचा पोपट, राखी तित्तर, रंगीत तित्तर, मराठा सुतार, सुभग, महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, मोर, खाटीक, हळद्या, कोकीळ, ससाणा, लार्क असे अनेक पक्षी दिसतात. यात गिधाडे आणि गरूड इथे घरटी करू लागली आहेत. तसेच बिबट्या, तरस, रानमांजर असे अनेक प्राणी दिसतात. तसेच हरणटोळ, धामण, कवड्या, पहाडी तस्कर याचसोबत घोणस, नाग आणि वायपर असे विषारी सापही आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*