BLOG : उच्छाद!

0

हरियाणा-पंजाबात जे घडल, ते भयंकर आहे. एखादा उपटसुंभ बाबा सरकार, यंत्रणा आणि सामान्य जनतेला कोणत्या थरापर्यंत वेठीस धरू शकतो, याचे हे ढळढळीत उदाहरण! राज्यव्यवस्था एखाद्याच्या वळचणीला बांधली की यापेक्षा वेगळा परिणाम संभवत नाही. डेरा सच्चा सौदाचा तथाकथीत प्रमुख गुरमित रामरहीम सिंग दोन साध्वींवरील अत्याचारप्रकरणी दोषी असल्याचा निर्वाळा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. सोमवारी त्याला या प्रकरणात शिक्षाही ठोठावली जाईल. हा एकप्रकारे भारतीय लोकशाहीचा विजय! पण हरियाणा सरकार या बाबाला शिक्षा होईपर्यंत ज्या पद्धतीने वागली त्यावरून खरेच यांना लोकशाहीशी काही घेणेदेणे आहे का, याची शंका येते. शिक्षा होताच पंचकुलासारखे शांत शहर या बलात्कारी बाबाच्या अनुयायांनी पेटवले. 36 बळी घेतले. शेकडो कोटीच्या मालमत्तेचे नुकसान केले. निकाल येणार आणि गडबड होणार, हे आधीच लक्षात आले होते. तरिही हरियाणाचे मुख्यमंत्र्यांना हा बाबा सज्जन आणि सोज्वळ वाटत होता. त्याचे समर्थक गोंधळ घालतील ही शक्यता हरियाणातील जनतेला होती. पण मुख्यमंत्र्यांना तसे वाटत नव्हते. लोकशाही आणि कायदा व्यवस्थेचे ज्यांनी संरक्षण करायचे, त्यांच्याच डोळ्यावर या बाबा-बुवांनी चढवलेले झापडे किती गहीरे आहेत, याचा अंदाज यावा! नेमक्या याच वृत्तीवर न्यायालयानेही ठपका ठेवला आहे. बाबाच्या समर्थकांनी जो भडका उडवला, तो आटोक्यात आणण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक टाळले, असे न्यायालयाचे निरीक्षण आहे. यावरच न थांबता केंद्राच्या भुमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आपण देशाचे पंतप्रधान आहात, याची आठवण खुद्द न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना करून द्यावी लागली आहे. अलिकडे धर्माच्या नावाने माजवला जाणारा उच्छाद वाढला आहे. आताच्या प्रकाराने तो अधिक ठळक केला. जनता अच्छे दिनच्या प्रतीक्षेत होती. हा उन्माद अच्छे दिनचे प्रतीक आहे का, हे आता सरकारने स्पष्ट केले पाहिजे. धर्माच्या नावाने बाजार मांडणार्‍यांचे गारूड किती आहे, याचा पुरावा हरियाणाच्या अ‍ॅडव्होकेट जनरलने शिक्षा सुनावल्यानंतर बाबाची बॅग उचलून देशाला दिला. बाबू, बाबा, माँ अशी नावे धारण करून देशाला वेठीस धरणार्‍यांची जमात आता हाताबाहेर गेली आहे. गुन्हे करूनही झुंडीच्या मदतीने लोकशाहीला वाकवण्याचे धाडस वारंवार होत आहे. गुरमित, आसाराम यांच्यासारख्यांनी संस्थाने उभे करून देशभर उच्छाद मांडला आहे. या बुवा-बाबांनी समाजाचे किती आणि काय चांगले केले? धर्माच्या नावावर वारंवार आपण विशिष्ट असल्याचे जाणीव मात्र ते कायम करून देत गेले. यांच्या व्यापाराला आणि गुंडागर्दीला वेळीच आवर घालण्याची गरज आहे. खरेतर हे लोकशाहीपुढील आव्हान आहे. सरकारने यापुढे तरी सरकारसारखे वागावे!

LEAVE A REPLY

*