BLOG: चतुरस्त्र अभिनेत्री!

0

भारतीय सिनेसृष्टीला आज सकाळी एका बातमीने धक्का दिला.

आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी, मराठीसह चित्रपटांचा पडदा गाजविणार्‍या अभिनेत्री रीमा लागू यांनी अचानक जगाचा निरोप घेतला.

दूरदर्शनच्या पडद्यावरून कधीकाळी रोज भेटणार्‍या रिमाताईंना कसे विसरायचे? अलिकडच्या काळात त्यांना पडद्यावरील ग्लॅमरस आई हे बिरूद चिटकले होते. मात्र त्याआधी एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांचा परिचय मराठी रसिकांना होताच! पडद्यावर आईच्या भूमिका जीवंत करण्याचे श्रेय काही मोजक्याच अभिनेत्रींच्या वाट्याला आले. त्यात रिमाताईंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वास्तव चित्रपटातील त्यांची आई तर हृदयस्पर्शी! अभिनेत्री म्हणून वाटचालीला आणि पडद्यावरील आईला नवा आयाम आणि उंची देणारी अदाकारी या चित्रपटातून दिसली होती. खरेतर हिंदी चित्रपटांच्या पडद्यावर स्टार मंडळींच्या गलक्यात सहाय्यक भूमिका आणि कलाकार झाकोळले जातात. मात्र रिमाताईंनी हा परिघही आपल्या अभिनय आणि व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर ओलांडला होता.

मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी, कयामत से कयामत तक हे हिंदी सिनेसृष्टीतील काही माईलस्टोन चित्रपट! या चित्रपटांतून अनेक स्टार जन्माला आले. काही पुढे सरकले. आमीर खान, माधुरी दीक्षित, सलमान खान, संजय दत्त, काजोल, शाहरूख खान या वानगीदाखल नावांवरून नजर टाकली तरी याची साक्ष पटते. मात्र या गर्दीतही रिमाताईंनी आपली स्वतंत्र छाप सोडली. त्यांच्यातील अभिनेत्रीची ही कमाल होती. आज दूरचित्रवाहिनीवर मालिकांचा गलका उडाला आहे. हास्यमालिकाही अनेक! मात्र एक-दीड दशकापूर्वीचा काळ आठवा. खाजगी वाहिन्यांनी नुकतेच बाळसे धरल्याचा तो काळ. त्यावेळी श्रीमान-श्रीमती आणि तू तू मैं मैं या मालिका भारतीय प्रेक्षकांच्या जीवनात हास्य फुलवित होत्या.

त्यात नवर्‍याशी नोंकझोंक करणार्‍या रीमाताई आजही मनात घर करून आहेत. किंबहुना प्रत्येक महिलेच्या भावविश्‍वात याच भुमिकांमुळे त्यांचा अलगद प्रवेश झाला होता. त्यांच्या नाटकांनीही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. त्यांच्या अभिनयाचा प्रारंभच रंगमंचावरून झाला होता. त्यामुळे त्यांचे नाटकांवरील प्रेम अबाधीत राहीले. पण त्या आठवणीत राहिल्या त्या पडद्यावरील सोज्वळ, प्रेमळ आई म्हणूनच! या चतुरस्त्र अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली!!

LEAVE A REPLY

*