BLOG : संसदेतील दांडीबहाद्दर खासदार

0

आपल्या देशात घटनेनुसार सर्व नागरिक समान असले तरी काही जण अतिविशिष्ट असतात. सेलेब्रिटी हे तर त्यावरील पातळीवर मोडतात! कालच्या दोन घटनांनी लक्ष वेधून घेतले. एक होती राज्यसभेत दांड्या मारणार्‍या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्याविषयी. तर दुसरी पक्षाने व्हीप बजावूनही राज्यसभेत अनुपस्थित राहीलेल्या भाजपा खासदारांविषयी. सचिन आणि रेखा यांचे चाहते मात्र या बातमीने हिरमुसले. चित्रपटात अन् मैदानात अतुलनीय कामगिरी बजावणारे हे दिग्गज संसदेत मात्र अपयशी ठरलेत. लोकसभा आणि राज्यसभेत खास खासदारांच्या दांड्या काही नव्या नाहीत. खेळाडू, अभिनेते वगैरे मंडळी तर या सभागृहांपासून फटकूनच वागतात. हेमा मालिनींसारखा एखादा अपवाद असतो. त्यामुळे या सदस्यांकडून काही धोरणात्मक चर्चांमध्ये सहभाग किंवा लोकप्रश्‍नांची मांडणीची अपेक्षाच अवास्तव ठरते. काल राज्यसभेत समाजवादी खासदार नरेश अग्रवाल यांनी नेमके याच मुद्यावर बोट ठेवले. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना राज्यसभेत देण्यासाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी. अग्रवाल उत्तर प्रदेशातून असले तरी गंभीर प्रवृत्तीचे खासदार आहेत. राज्यसभेतील चर्चेतील त्यांचा सहभाग लक्षणीय असतो. त्यामुळे त्यांची मागणी अव्हेरून चालणार नाही. मुळात आपला लोकसभा आणि राज्यसभेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात दांडीबहाद्दर सेलिब्रेटी का खपवून घेतो? दोघे परवानगी घेवून गैरहजर असल्याची माहिती राज्यसभा प्रशासनाने दिली. पण म्हणून या प्रश्‍नातून त्यांची सुटका योग्य ठरते का? ही केवळ उदाहरणे आहेत. राज्यसभेतील ही भरती अनेकदा किती उपयोगी ठरते, हे एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. केवळ नियम आहे म्हणून खासदार उपाधीने सन्मानीत करण्याचा हा प्रकारही एकदा सरकारने तपासून घेतला पाहिजे. जी तर्‍हा या स्टार मंडळींची तीच अन्य खासदारांचीही. भाजपाने राज्यसभेतील उपस्थितीबाबत व्हीप बजावूनही काहींनी दांडी मारली. यामुळे त्यांना समज देण्याची वेळ पक्षाध्यक्ष अमित शहांवर आली. दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने राज्यसभेतील खासदारांच्या एकूणच गंभीरतेविषयी प्रश्‍नचिन्ह लागणे सहाजिक आहे.

LEAVE A REPLY

*