BLOG : काँग्रेसचे सुलतान!

0

सल्तनत चली गयी, फिरभी सुलतानो की तहर बरताव…अशा एका वाक्यात ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. अनेक वर्षे सत्तेत पहुडल्यानंतर शिरलेले वारं अद्याप काँग्रेसला अंगाबाहेर काढता आलेलं नाही. नेमक्या याच स्थितीवर रमेश यांनी बोट ठेवले आहे. रमेश हे विरोधक नाहीत. गांधी घराण्याच्या दरबारी राजकारणातील एक विश्‍वासू म्हणून त्यांची ओळख! त्यामुळे आता त्यांना तरी काँग्रेसचे नेतृत्व गंभीरपणे घेणार का? सध्या देशभरात काँग्रेसची वाताहत झाली. याला पक्षाचे नेतृत्वही कारणीभूत आहे. सत्ता असताना जमिनीवर पाय टेकवण्याची सवय सुटल्याने आता सत्ता जावून 3 वर्षे उलटल्यावरही अनेक नेत्यांच्या मानसिकतेत फार बदल दिसत नाही. काँग्रेस केवळ राजकीय संकटाचा सामना करत नाही, तर पक्षाच्या अस्तित्वालाच आव्हान मिळाले आहे, असे रमेश यांचे निरीक्षण! आता केवळ विचार आणि कामाची पद्धत बदलून चालणार नाही तर लोकांशी संवादही वाढवावा लागेल, अशी पुस्तीही ते जोडतात. गेल्या काही वर्षापासून अनेक राजकीय विश्‍लेषक काँग्रेसला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आता कुठे काँग्रेसमधील दुसर्‍या फळीतील नेत्यांचा पटायला आणि पचायला लागले आहे, असे दिसते. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही केंद्रातील नेतृत्वाकडून, खास करून राहुल गांधी या नेत्याकडून मिळणार्‍या वागणुकीने राज्यातील स्थानिक नेतृत्व नाराज होते किंवा आहेत. काहीच ऐकायचे नाही, केवळ ऐकवायचे या धाटणीने पक्ष आणि राजकारण कसे चालणार? जुन्या घोषणा आणि फॉर्म्युले आता कामाचे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि वेगळ्या पद्धतीने कामही करतात. काँग्रेसनेही आपल्या दृष्टीकोनात लवचिकता आणावी. अन्यथा पक्ष कालबाह्य ठरेल. भारत बदलला आहे. काँग्रेसनेही बदल स्वीकारला पाहिजे, असे रमेश यांचे मत! त्यांनी याबाबत राहुल गांधींशी सविस्तर चर्चा केली तर बरे होईल. पक्षाचे युवराज किमान जवळच्या माणसांचे ऐकतात, असा एक समज आहे. तसे असेल तर रमेश यांच्यासारख्या नेत्यांनी बदलांची सुरूवात त्यांच्यापासून केली पाहिजे. देशाला समर्थ विरोधी पक्ष नसणे लोकशाही दुबळे करणारे ठरेल. त्यामुळे एका सक्षम विरोधकाची देशाला गरज आहे. जो आज दिसत नाही. काँग्रेस ही जागा भरून काढणार असेल तर त्याचे स्वागतच असेल. पण त्यासाठी आधी विचार आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागेल. कधीकाळी सुलतान होतो. आता ते दिवस सरले आहेत. हे पूर्णपणे मान्य करावे लागेल. काँग्रेसला हे शक्य आहे?

LEAVE A REPLY

*