BLOG: बदल घडो!

0
नगर शहराने रविवारी 527 वा स्थापनादिन साजरा केला.
अलिकडे प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट होणे, ही अत्यावश्यक बाब मानली जाते. यातून काय हाती लागते, याची चिकीत्सा होवू शकते. पण म्हणून प्रत्येक इव्हेंटकडे प्रश्‍नार्थक नजरने पाहणे योग्य ठरणार नाही.

नगर स्थापनादिनाच्या निमित्ताने गटा-गटाने अनेक कार्यक्रम साजरे झाले. विचार व्यक्त झाले. नव्या दिशेने जाण्याच्या कल्पना मांडल्या गेल्या. काही कल्पनांचा विस्तार झाला. हे बरेच म्हटले पाहिजे. तसा शहराचा स्थापनादिन हा अलिकडेच ऐरणीवर आलेला विषय! दोन-चार वर्षापूर्वीचा.

तत्पूर्वी याबाबत फारशी जागृती नव्हतीच! खरेतर नगर शहराला उत्तम इतिहास आहे. लिखित असल्याने तो वास्तवही आहे. केवळ कल्पनांवर आधारित नाही. असे भाग्य फार थोड्या शहरांना लाभले आहे. पण याच शहराबाबत आखणी एक वास्तव आहे, ते म्हणजे सुस्त मार्गक्रमणाचं! या शहराच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले. पण तोही आता इतिहास झाला.

अलिकडच्या 25 वर्षांत नगरचा वेग कमालीचा मंदावलेला. शेजारची शहरे वेगाने धावत होती. पण नगरला त्याची कधी गरज वाटली नाही. अलिकडे पिढीतील बदल नगरच्या पथ्यावर पडला, असे म्हटले पाहिजे. किती दिवस आपले शहर असेच राहणार, हा त्यांचा प्रश्‍न आता कुठेतरी क्रियाशील मार्ग तयार करत आहे. शहरातील व्यापार उदीमाला एकप्रकारे झळाळी आहे. सभोवतालही तसा संपन्न! भूगोल तर अतिपूरक. पण याचा फायदा नगरला झाला नाही. या अविकासाचे ‘वाटे’करी कोण, यात आता नगरकरांनाही स्वारस्य राहीलेले नाही. पुढील बदलांसाठी तो सज्ज होत आहे, हे मान्य केले पाहिजे.

स्थापनादिनाच्या निमित्ताने बदलांचा विचार पाझरणे, विस्तारणे, त्याला आकार येणे हे अधिक महत्त्वाचे! शेवटी हे शहर आपले आहे, ते आपल्यालाच बदलावे लागणार आहे. त्यासाठी पुढाकार आणि वेळही आपल्यालाच द्यावा लागणार आहे. दुसर्‍यावर विसंबून हे शक्य नाही. नेमकी हीच जाणीव अलिकडच्या काळात नगर शहरात जागी झालेली दिसते. त्याचा विस्तार होण्यास शहराचा स्थापनादिन पूरक ठरतो, हे मान्यच केले पाहिजे. अन्यथा बदलांचा विचार मांडण्यासाठी व्यासपीठ आहे कुठे? जागतिक बदलांचे वारे आता नगरनेही स्वीकारले पाहिजे.

शेजारच्या पुणे, नाशिक आणि औरंगाबादच्या वाढीचा वेग मंदावला आहे. त्याचा फायदा या शहराला सर्वार्थाने होवू शकतो. मध्य महाराष्ट्रातील प्रगतीला पूरक नगरसारखे दुसरे शहर नाही. मात्र येथील काही घटकांनी या शहराबद्दल एक नकारात्मक प्रतिमा निर्माण करून ठेवली आहे. तिला छेद देण्यासाठी आता या शहरातील नागरीकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आस्ते कदम असले तरी स्थापनादिनाच्या निमित्ताने होणारे मंथन आशादायक आहे.

LEAVE A REPLY

*