BLOG: नेवाशात गडाख, मुरकुटेंचा जांगडगुत्ता!

0

विदर्भात एक शब्द हमखास कानावर पडतो. तो म्हणजे जांगडगुत्ता! याचा नेमका अर्थ काय? तो स्पष्टपणे सांगता येत नाही. प्रसिद्ध वर्‍हाडी कवी मिर्झा रफिक बेग या शब्दाचे सिद्धहस्त वापरकर्ते. अर्थात नगर जिल्ह्यातही हा शब्द वापरला जातो, पण फक्त कीर्तनात!
काही वाक्ये बघा…‘आपले काम काही जमना बुवा, काय जांगडगुत्ता झाला की’…‘हातचा उमेदवार पडला ना राजा, कसा जांगडगुत्ता झाला समजेना?’, ‘फालतूचा जांगडगुत्ता करू नको, लई महागात पडन ’… यातील जांगडगुत्ताचा अर्थ काय? तो आपण आपल्या सोयीने लावलेला बरा! असो, तर हा जांगडगुत्ता आठवण्याचे कारण म्हणजे नेवासा नगरपंचायतीचा निकाल! मतदारराजाने असा काही ‘जांगडगुत्ता’ करून ठेवला की निकालाचा अर्थ कसा काढायचा, हेच आता अनेकांना कळेना. माजी आमदार शंकरराव गडाख आणि विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे समर्थक देखील बुचकळ्यात पडले असतील.

निकालावर हर्ष व्यक्त करायचा की खेद, या विचारात त्यांनी निकालाची रात्र घालवली असणार! 17 जागांच्या नेवासा नगरपंचायतीत गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने 9 जागा जिंकून बहुमत पटकावले. तर नगराध्यक्षपदासाठी आरक्षित, अनुसूचित जमातीसाठीच्या वॉर्डात भाजपाच्या महिला उमेदवार विजयी झाल्या. लोकशाही हा आकडे आणि नियमांचा खेळ! आकड्यांचा खेळ गडाखांच्या बाजूने आला, तोही बहुमताने! पण सत्तेचे मुख्यपद तांत्रिकदृष्ट्या भाजपाकडे. सत्तेचे सुख कोणालाच निर्विवादपणे घेता येणार नाही, अशी ही स्थिती! झाला की जांगडगुत्ता!
नेवासा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होतानाही पडद्याआड बरेच राजकारण रंगले होते. हे गाव तसेही कोणाचे वर्चस्व जुमानत नाही. यापूर्वी गावात गडाख समर्थक सरपंच होता, तरी गावावर गडाखांचे निर्विवाद वर्चस्व नव्हतेच! गडाख, घुले आणि सेना अशी सत्तेची मोट बांधली जायची. गडाख विरोधकांना नेवासा नगरपंचायत होण्यात अधिक रस होता. पण अलीकडच्या राजकारणात गडाखांनी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून राजकारणाचा नवा डाव सुरू केला आणि नेवासा तालुक्यातील राजकारणाची दिशाच बदलली.

नेवासा नगरपंचायतीची निवडणूक ही विधानसभेपूर्वी तालुक्यात होणारी शेवटची मोठी निवडणूक! 2014 मध्ये पराभव झाल्यानंतर गडाखांनी मतदारसंघ पुन्हा बांधणीसाठी घेतला. साखर कारखाना, सहकारी संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी सर्वच सत्ताकेंद्रे गडाखांनी मजबूत करून घेतली. नेवासा नगरपंचायत यातील शेवटचा टप्पा. गडाखांच्या वाढत्या विस्ताराला नेवासा नगरपंचायतील ब्रेक लागेल, अशी अपेक्षा त्यांच्या विरोधकांना होती. पण गडाखांनी अखेर नेवासा शहरातही ‘माणसां’ची पेरणी करून घेतली!
नेवासकरांनी गडाखांच्या हाती बिना स्टेअरिंगची गाडी सोपविली. गाडी ताब्यात असली तरी ती चालवणारा चालक मर्जीतला नसेल! त्यामुळे गाडी भरकटली तर त्याचा दोष माझा नाही, असा दावा करण्याची सोय गडाखांना आहे! याऊलट स्थिती बाळासाहेब मुरकुटेंची. त्यांच्याकडे गाडी नसली तरी स्टेअरिंग आहे. नेवासा शहरात जो काही विकास झाला, तो त्यांनीच गेल्या अडीच वर्षात केला, असा त्यांचा दावा होता. खुद्द नेवासकरांनीच त्यांच्या पदरात 17 पैकी 6 जागा टाकून याचे ‘प्रमाणपत्र’ (!) दिले आहे. मंत्री आणि आमदारांचा ताफा आणून त्यांनी केलेल्या विकासाच्या दाव्यावर हा निकालच पुरेसा प्रकाश टाकतो! गंमत म्हणजे जिभेवर सतत ‘जयहरी’ वागवणार्‍या आ. मुरकुटेंनी यावेळी प्रचारात यातील ‘य’ या शब्दाला तिलांजली दिली. त्यांनी भन्नाट ‘जहरी’ हल्ले गडाखांवर केले. मतदारांना तेेे किती रुचले, याचाही बोध निकालावरून होतो. या हल्ल्यांचा परिणाम गडाखांवर किती झाला, हे अलहिदा! पण आता आ.मुरकुटेंनी येथेच थांबून चालणार नाही. त्यांनी नवे शब्द शोधावे, त्यांना जोरदार धार द्यावी आणि पुन्हा हल्ले करावे. आमदार असल्याने ते त्यांना शोभूनही दिसतील! नगराध्यक्ष भाजपाचा होणार असल्याने शहराच्या विकासाची जबाबदारीही आता पूर्णपणे त्यांच्यावर आहे. पुढे विधानसभा असल्याने यात अपयश परवडणार नाही. गडाखांकडे सभागृहातील बहुमत आहे. पण आमदार निधी आणि निधी खर्च करण्यासाठी सही करणारा नगराध्यक्ष आ.मुरकुटेंकडे राहील. त्यासाठी नियमानुसार सभागृहाची परवानगी घ्यावी लागत जाईल. पण त्यामुळे जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी विकासासाठी गडाखांकडे सहकार्याची मदत मागीतली आहे. बहुधा ती मिळेलही! पण हा सहवास कसा चालेल, याचा काही अंदाज नाही. ते काहीही असले तरी अपयशासाठी प्रत्येकवेळी गडाखांकडे बोट दाखवणे मतदार यापुढे खपवून घेणार नाहीत, याची जाणीव आ.मुरकुटेंनी ठेवलेली बरी!
सख्खेशेजारी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी या निवडणुकीतही ‘नेहमीसारखी’ सावध भुमिका घेतली. त्यांनी जुनाच पट मांडला. या निवडणुकीत राष्ट्रवादी केवळ नावालाच दिसली. भेंड्याची रसद नेमकी कुठे गेली, हे नव्याने सांगणे नको! तरीही गडाखांचा पूर्ण पाडाव झाला नाही. खरेतर गडाखांना कोणीतरी रोखले पाहिजे. तालुक्यातील सत्तासंतुलनासाठी हे आवश्यक आहे. नेवासा मतदारसंघातील नागरिकांना कितीदा ‘डमी’ पर्याय द्यायचे, यावर आता भेंड्यातील ‘मालकां’नी सखोल विचार करावा. लुटपुटूच्या लढाईने काय हाशील होणार? त्यापेक्षा गडाखांशी थेट दोन हात झाले पाहिजे. त्यासाठी एखादा पट्टीचा पहिलवान शोधून त्याच्यामागे जाहीरपणे उभे राहिले पाहिजे. ‘आडमार्गा’च्या राजकारणाचा आता (उरलेल्या) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही कंटाळा आला असेल. त्यांचा तरी विचार करावा! पूर्वी गडाखांसोबत पक्ष वाटून घ्यावा लागत होता, म्हणून अडचण होती. आता तर थेट वार करण्याची सोय आहे. तिकडे गडाख कुकाणामार्गे थेट भेंड्याच्या ऊसात घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यांना वेळीच रोखले पाहिजे. अन्यथा बॉयलरमधून धूर काढायची पंचायत होईल! किमान बॉयलर रक्षणासाठी तरी राजकीय तलवार परजली पाहिजे!
प्रभाग 17 मध्ये विजयी होणारा उमेदवारच नेवाशाचा नगराध्यक्ष होणार, हे स्पष्टच होते. आमदार मुरकुटेंना हे कळले होते. म्हणूनच त्यांनी या वॉर्डात मोठी ‘शक्ती’ लावली. पण गडाख काय आज राजकारणात आले की काय? त्यांना हे कसे कळले नसेल? जाऊ द्या…का उगाच डोक्याला ताण? राजकारणातला जांगडगुत्ता तसाही समजायला सोपा नसतो!

……. अनंत पाटील

LEAVE A REPLY

*