BLOG : वाटमारी अन् साठमारी

0

कोणत्याही घराची कळा अंगण सांगते. तसे शहराची कळा रस्ते सांगतात. अन् नगर शहरातील रस्ते तसे ऐतिहासिक. इथे चाँदबिबी परत आली तरी रस्ता चुकणार नाही, असे उपहासाने सांगितले जाते. यातील उपहास वगळला तरी ते दुखरे वास्तव आहे. नगर हे खेडे आहे की शहर? याची व्याख्या समाज अभ्यासकालाही करता येणे कठीण. शहराच्या बकालपणाची जबाबदारी नेमकी कोणाची? अर्थातच राज्यकर्त्यांची? परंतु त्यांची सत्तेच्या साठमारीतून वाट काढता काढताच त्यांची पुरी वाट लागली आहे. त्यामुळे रस्ते आणि नगर करायला त्यांच्याकडे वेळ नाही.
खासदार दिलीप गांधी म्हणतात 25 वर्षात नगरला ‘त्यांनी’ टपर्‍यांचे शहर बनविले. आमदार संग्राम जगताप म्हणतात ‘त्यांना’ महापालिकेचा कारभार चालविता येत नाही. महापौर सुरेखा कदम म्हणतात, एकाच घरात दोन आमदारकी असतानाही ‘त्यांना’ घरासमोरचा रस्ता करण्यासाठी महापालिकेचा निधी वापरावा लागला. आणि नेमके कोणाच्या बोलण्याचं मोल आहे आणि कोणाचा तोल गेला आहे. हे तुम्ही-आम्हीच ठरवायचं. एकाला झाकून ठेवून दुसर्‍याला बाहेर काढावा या उक्तीप्रमाणे महापालिकेचा कारभार सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरून आमदार जगताप आणि महापौर कदम यांच्यात कलगीतुरा सुरू झालाय. जिल्हा प्रशासनाकडून रस्ता कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळत असताना तो घेण्यासाठी प्रस्तावही महापालिकेतील सत्ताधारी सेनेला करता आला नाही, असा जगताप यांचा आरोप आहे. त्यासाठीच तर राष्ट्रवादीने सेनेच्या कारभार्‍यावर आरोप करत महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. महापौर सुरेखा कदम यांनी अवलोकन करण्याऐवजी त्यांनी घरात दोन आमदारकी असताना जगताप यांना घरासमोरचा रस्ता करण्यासाठी महापालिकेला मिळालेल्या मुलभूत सुविधा निधीचा वापर करावा लागला. आमदारकी असताना घरासमोरचा रस्ता करता न येणार्‍यांना तेव्हाच हा रस्ता दिसला नाही का? असा कदम यांचा सवाल आहे. महासभेची मान्यता न घेतल्याने तसा ठराव करण्यास वेळ लागल्याची वस्तुस्थिती आहे. खासदार दिलीप गांधी हे गेल्या 25 वर्षात नगर फक्त टपर्‍यांचे शहर बनल्याचा आरोप अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळून करतात. त्या आरोपातही तथ्य नाही असे कसे म्हणता येईल. आमदार जगताप यांच्या घरासमोरील भवानीनगरमधील कॉक्रिटीकरणाचा रस्ता चांगला असतानाही त्यावर 90 लाख रुपये खर्च करण्यात आला. आपल्या घराकडील वाट राजरस्ता बनवायची आणि वॉर्डातील रस्ते खड्ड्यात घालायचे. हे लोकांच्या लक्षात येत नाही असे नाही. राठोड आमदार असताना गांधी खासदार होते. केंद्रात मंत्रीही होते. तेव्हा त्यांना टपर्‍यांच्या शहराची ओळख मोडता आली असती. तेव्हा त्यांनी विरोध केल्याचे ऐकिवात नाही. मग टपर्‍यांच्या शहराचा आताच कसा साक्षात्कार झाला. गणेशोत्सवात एका मंडळाने शहराच्या प्लॅनबद्दल देखावा सादर केला. त्याचे खासदारसाहेबांनी तोंडभरून कौतुकही केले. मात्र, स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे असा काही प्लॅन आहे काय? असेल तर त्याची ब्लू प्रिंट एकदा नगरकरांना दाखवा. (फक्त उड्डाणपुलाचे सांगू नका.) नाही तरी देश बदल रहा है.. चा नारा देत देशभर तुमचे मोदी सरकार ढोल बडवित आहेच. मग नगर बदल सकता है.. असा संकल्प करून टाका म्हणजे टपर्‍यांच्या शहराची ओळख पुसून कार्पोरेट लूक येईल!

LEAVE A REPLY

*