BLOG: नवनिर्मितीसाठी आत्मचिंतनाची वेळ!

0
नवनिर्मितीचे काम होणार नसेल तर समाजाचे प्रश्‍न कसे सुटणार? समाजात विविध प्रश्‍न आहेत. दारिद्य्र आहे. गरिबी आहे. बेरोजगारी आहे. यावर नेतृत्वाने काम केले पाहिजे. ही पुढील काळाची गरज आहे… यशवंतराव गडाख यांनी माझे संचित या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केलेली अपेक्षा आज अगत्याची आहे आणि तेवढीच आत्मचिंतनाची…

‘आजकाल राजकारणात येणार्‍या पिढीला असे वाटते, की आपली वाट फुलांनी अंथरलेली आहे. त्यावरून फक्त चालत जायचं आणि खुर्चीत बसायचं. अशाप्रकारची अपेक्षा धरून अनेकजण येतात. आज नगर जिल्ह्यात अनेक तरुण राजकारणात, समाजकारणात दिसतात. काम करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. शिक्षीत आहेत. उच्चशिक्षीत आहेत. पण अनेक तरुण असे आहेत की ज्यांना येथे यायचे तर कशासाठी यायचे? काय करायला यायचे? आपले उद्दिष्ट काय? आपले ध्येय काय? आपले धोरण काय? याचा काहीही विचार करत नाही. फक्त निवडणुका लढवणं. मोर्चे काढणं. निवेदन देणं, एवढ्यापुरत मर्यादित काम तरुण शक्तीकडून होत असेल. नवनिर्मितीच काम होत नसेल. तर समाजाचे प्रश्‍न कसे सुटणार?’…ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा हा सवाल! थेट आणि तितकाच वास्तव. आजच्या पिढीतील राजकीय सवयींवर थेट बोट ठेवणारा!

सोनईत ‘माझे संचित’ या गडाख लिखीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. शब्दलालित्याने सजलेली प्रकाशनसंध्या एकाअर्थी राजकीय भाष्य करणारी ठरली. अर्थातच अग्रभागी होते अमृतमहोत्सव साजरा करणारे यशवंतराव! 50 वर्षांच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक वाटचालीचा यावेळी उल्लेख होणे क्रमप्राप्तच होते. पण याही काळात वास्तवाचं भान राखत, नव्या प्रश्‍नांकडे बोट दाखवून ते सोडविण्यासाठी प्रोत्साहन देणारे यशवंतरावांचे शब्द त्यांच्या आवाजाएवढेच भारदस्त ठरावे! त्यांचे भाषण आहे तसेच वाचकांपुढे ठेवावे की त्याचे विश्‍लेषणही करावे, हा पेच होताच. सहज, सरळ, भिडणारी भाषा. विचार स्पष्ट. त्याचा पुन्हा उलगडा करणं तसं अवघड. तरीही त्यांचे शब्द काही नवे अर्थही मांडतात. समाजाची चिंता वाहतात. पुन्हा नवनिर्मितीची स्वप्ने दाखवतात!

‘एकदा पंचाहत्तरीच्या पुढे माणूस गेला की एकप्रकारची तन्मय अवस्था येते. त्या अवस्थेमध्ये सर्व राग, लोभ, द्वेष मनातून निघून जातात. माझ्या मनात आज काही नाही. कोणाबद्दल राग नाही. कोणाबद्दल द्वेष नाही. कुठलीही अभिलाषा नाही. अशा अवस्थेत आल्यानंतर एकप्रकारची तटस्थतेची भावना निर्माण होते. प्रत्येक प्रश्‍नाकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती निर्माण होते. ती आज आहे…’ खरे तर यशवंतरावांनी आपल्या भाषणात अखेरीस व्यक्त केलेल्या या भावना. मात्र जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख आधी करण्याची इच्छा होते. आजकालच्या द्वेषयुक्त राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर ते अगत्याचे वाटते. पण यशवंतराव अत्यंत खुलेपणाने याकडे पाहतात. राजकारण्यांविषयी जे नकारात्मक चित्र उभे राहिले, त्याला चित्रपट, नाटक वगैरे प्रकार कारणीभूत ठरली. ते पाहून, वाचून असे वाटते की राजकारणी सतत तमाशाच्या बारीवरच असतो, अशी त्यांची खंत. प्रत्येक क्षेत्रात काही वाईट लोकं असतात. कुठले क्षेत्र असे नाही? या प्रश्‍नासह ते राजकारणाचा उजवा पोतही दाखवू इच्छितात!

‘आमचा काळ भारावलेला होता. नवनिर्मितीचे ध्येय होते. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समाजिक संस्था उभ्या राहिल्या. सहकारी कारखानदारी उभी राहिली. ही कशी उभी राहिली? पद्मश्री डॉ.विखे पाटलांनी प्रवरेच्या परिसरात कारखाना काढला. त्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागले असेल? माझ्या आधीचा तो काळ होता. आपल्यालाही कोणत्या दिव्यातून जावे लागले. आज आपण सहज म्हणतो, यांनी कारखाना काढला. त्यांनी कारखाना काढला. आता सोपं आहे ते. 40 वर्षांपूर्वी अवघड होतं. हे सर्व समाजापुढे आलं पाहिजे. आपण लिहीत नाही. वाचत नाही. आपण लिहीलं पाहिजे. हे समाजापुढे आलं पाहिजे. म्हणून माझ्या ‘अर्धविराम’ या पुस्तकामध्ये कारखाना कसा उभा राहतो, हे मांडलं. 15-17 वर्षांचा काळ मला कारखाना उभा करण्याकरता लागला. अनेक अपमान सहन करावे लागले. अनेक कष्ट घ्यावे लागले. त्याची पुनरावृत्ती करायची नाही. मात्र ते लेखनाच्या निमित्ताने समाजापुढे आलं’….आपल्या लेखनप्रेरणेला जन्म देणारी वेदनाही यानिमित्ताने ते सहजपणे उलगडून गेले.

पुढे पुस्तकात भेटणारी माणसे आयुष्यात कशी भेटली, याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. ‘माझ्या पुस्तकात व्यक्तीरेखा आहेत. गावातील माणसे मला कशी भेटली? कार्यकर्ते कसे भेटले? मला प्रवास आवडतो. निसर्ग आवडतो. पाऊस आवडतो. तसंच मला माणसं सुद्धा आवडतात. म्हणून मी टपरीवाल्याबद्दल लेख लिहिला. नक्षलवादी परिसरात गेलो होतो, त्यावर लिहिले. मेळघाटला गेलो होतो, तेथे भेटलेले शिक्षक, काम करणारे लोकं माझ्या लेखनात उतरली. ही माणसे आजही माझ्या संपर्कात असतात. ज्या-ज्या ठिकाणी आपण जातो-फिरतो-प्रवास करतो, त्यावेळी निसर्ग पाहतो त्याचबरोबर माणसंही वाचता आली पाहिजे.’ हा त्यांच्या लेखनात डोकावणार्‍या माणसांचा संदर्भ. श्रीमंत आणि जीवंतही!

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तरुण राजकारण्यांची पिढी आवर्जून उपस्थित होती. त्यात स्वत:ला सिद्ध करणारे तरुण राजकारणी होते. तसेच सिद्ध करू पाहणारेही होते! धडपडणार्‍या नवराजकारण्यांसाठी यशवंतरावांचे भाषण वडिलकीचा सल्ला होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काय म्हणाले ते?…‘राजकारणामध्ये काम करत असताना आजचं चित्र आणि उद्याचं चित्र काय असेल, याचा विचारही मनामध्ये येतो. आमच्या काळात काम करणारी आमची पिढी, त्यामध्ये शरद पवार असतील, गोविंदराव आदिक असतील असे अनेक तरुण त्या काळामध्ये महाराष्ट्रात नवनिर्मितीसाठी झटत होते. आमचा काळ हा निर्मितीचा होता. यशवंतराव चव्हाणांच्या सानिध्यात होतो. चव्हाण साहेब तेव्हा सांगायचे, केवळ प्रश्‍न मांडू नका. प्रश्‍न तर कोणीही मांडेल. मला या प्रश्‍नांची उत्तरे पाहिजे. म्हणून सावकारशाहीतून जी परिस्थिती नगर जिल्ह्यात होती. त्याला उत्तर सहकारी संस्थांनी, कारखानदारीने, बँकांनी दिले आहे. तो आमचा काळ होता. आम्हाला वैचारिक पाठबळ होतं. संस्था उभ्या करण्यात आमचं आयुष्य घालवलं. संस्था उभ्या केल्या. त्या चालवल्या. म्हणून येथून पुढे समाजकारण, राजकारणात येणार्‍या पिढीला सांगावसं वाटतं की, राजकारणाची जी वाट आहे ती फुलांनी अंथरलेली आहे. त्यावरून फक्त चालत जायचं आणि खुर्चीत बसायचं. अशा प्रकारची अपेक्षा धरून अनेकजण येतात. आज नगर जिल्ह्यात अनेक तरुण राजकारणात, समाजकारणात दिसतात. काम करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. शिक्षीत आहेत. उच्चशिक्षीत आहे. अनेक तरुण असे आहेत की आपण राजकाणात का यायचं? आपल उद्दिष्ट काय? आपलं ध्येय, धोरण काय? याच्याबद्दल काहीही विचार करत नाही. नवनिर्मितीचे काम होणार नसेल तर समाजाचे प्रश्‍न कसे सुटणार? समाजात विविध प्रश्‍न आहेत. दारिद्य्र आहे. गरिबी आहे. बेरोजगारी आहे. यावर नेतृत्वाने काम केले पाहिजे. ही पुढील काळाची गरज आहे. म्हणून आज मागे व़ळून पाहताना या गोष्टी जाणवतात, दिसतात. नव्या पिढीला एवढंच सांगेन की तुम्ही जुन्या पिढीच्या खांद्यावर बसले आहात. त्यांच्या खांद्याना विसरू नका. त्यांनी तुम्हाला जग पाहण्याचे बळ दिले आहे.’…

‘मला वाटलं ते लिहिलं. व्यक्तीमत्व एकांगी केलं नाही. फक्त राजकारण एके राजकारण करत बसलो नाही. खूप वाचलं. माझी ती आवड आहे. माझं ते वाचनं, फिरणं माझ्या लिखाणातून उतरलं. जे असेल ते! जी माणसं मला भेटली ती सामान्य माणसं आहेत. ज्या समाजात आपण वावरतो. तो समाज लोकांपर्यंत जायला हवा. कशी माणसे राहतात, असतात त्यादृष्टीने माझं लिखाण आहे.’…
नगर जिल्ह्याला जशी राजकीय संघर्षाची परंपरा आहे. तसा उच्च संस्कारही येथील राजकारणात झिरपलेला आढळतो. अनेक नेतृत्व पुस्तकातून व्यक्त होतात, ही देखिल या जिल्ह्याची श्रीमंती! ती अबाधीत ठेवण्याची, किंबहूना वाढवत नेण्याची जबाबदारी नव्या पिढीला पेलायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आयुष्यात केलेला संघर्ष, केलेली नवनिर्मिती मार्ग दाखवणारी आहे. या मातीतील माणूस लढवय्या आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रंगनाथ पठारे यांनी या कार्यक्रमात नगरकरांच्या संषर्घशील वृत्तीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नगर गॅझेटीअरमध्ये एक उल्लेख आढळतो. त्यानुसार नगर जिल्ह्यात वसलेल्या लोकांचे पूर्वज लढवय्ये होते. त्याकाळी राजांच्या सैन्यात होते. त्यामुळे या बकाल प्रदेशात नवनिर्मिती करण्याचे धाडस या माणसांनी दाखवलं. सैन्यात एकप्रकारे शिस्त असते. तोच गुण येथील सहकार फुलवताना दिसला.’ यात काही दुमत नसावे. पण आता जुन्या उभारणीवर किती दिवस इमले रचायचे हा प्रश्‍न उरतोच! त्यामुळे ज्येष्ठांच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या यशवंराव गडाख यांच्या नवनिर्मितीच्या मागणीवर युवानेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे.

LEAVE A REPLY

*