BLOG : असावे जातीचे

0

भारतीय राज्य घटनेने धर्मनिरपेक्षतेचे धोरण स्वीकारले आहे. घटनाकारांनी जाणीवपूर्वक या शब्दाचा वापर केला आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकवणे हाच त्यामागचा हेतू. लोकशाही शासन पध्दती दिवसेंदिवस प्रगल्भ होत जावी, अशी त्यांना अपेक्षा. मात्र, सध्या देशात प्रत्येक जातीला खालच्या जातीत जाऊन आरक्षण घ्यायचंय. त्यासाठी जाळपोळ आणि लाखोंचे मोर्चे काढले जात आहेत. यावरून कोणी जातीअंताची लढाई अंतिम टप्प्यात आलीय, असं विश्‍लेषण करणं चुकीचं ठरेल. ज्या पुण्यात अस्पृश्यतेविरोधात महात्मा ज्योतिबा फुले यांनी रान पेटविले. त्याच पुण्यनगरीत एक आक्रीत घडले. एका ब्राह्मण महिलेच्या घरी ‘अस्पृश्य’ मराठा विधवेने स्वयंपाक केल्याने तिचा धर्म बाटला. ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून तिने नोकरी मिळवली होती आणि ही आपली फसवणूक आहे, यावरून त्या ब्राह्मण महिलेने गुन्हाही दाखल केलाय. व्हायचा तोच गहजब झाला. संभाजी ब्रिगेडने या घटनेचा निषेध केला. ब्राह्मण महासंघही आपल्या भगिनीच्या संरक्षणासाठी उतरला. फसवणूक ती फसवणूकच मग ती कोणतीही असो. अशी भूमिका घेणार्‍या या संघटनेने सायंकाळी घुमजाव केले. ही वैयक्तिक घटना आहे. संबंधितांनी तो प्रश्‍न सामोपचाराने सोडवावा. सोवळे केवळ शुचिर्भुततेशी निगडित आहे, असे त्यांचे म्हणणे. मुळात हे प्रकरण वैयक्तिक वाटत असले तरी ते जातिवादामुळे सार्वजनिक झालेय. ज्या सोवळ्यामुळे पेशवाई बुडाल्याचे उदाहरण असताना कोणी धडा घ्यायला तयार नाही. ज्या छत्रपती शिवरायांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधीच मुहूर्त पाहिला नाही. एवढेच कशाला आपला देश स्वतंत्र झाला. त्या दिवशी अमावस्या होती. मग आपला देश शुभमहुर्तावर जन्माला आला नाही म्हणून काय पाकिस्तानात जायचे? याचे उत्तर सोवळे पाळणार्‍यांना विचारले पाहिजे. अस्पृश्य विधवेने नवैद्य केल्याने गौरी-गणपतीची पूजा लाभली नाही, असे घडीभर गृहित धरले. वास्तवात गणपती हा राक्षसांचा देव. काही इतिहासकारांनी ते सप्रमाण सिध्दही केलंय. राक्षसांच्या देवाला काय आलंय छूत-अछूत. कित्येक स्पृश्य-अपृश्यांचे विवाह झालेत. घटनाही अशा विवाहांना प्रोत्साहन देते. मग जातीचा आग्रह का धरावा. मुळात कितीही आपण जातीवादी नाहीत, असा जयघोष करीत असलो तरी जातीवादाचे असे रोकडे उदाहरण हररोज घडते. पुण्यात हे सोवळ्याचे प्रकरण झाकून राहिले नाही. एवढाच काय तो फरक.

LEAVE A REPLY

*