BLOG : लाल दिवा उतरला!

0

सामान्य माणूस सुखावेल, अशा घोषणा करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण गुण बहाल केले पाहिजे.

नोटाबंदी त्यातलाच एक! अनेकांनी याविरोधात राळ उडवली.पण ज्यांना अर्थकारणातील खाचखळगे कळत नाही किंवा समजून घेण्याची गरज नाही, अशा सर्वांनीच त्याचे स्वागत केले.

मुळात बहुतांश भारतीयांचा व्यवहारच काही शेकडा रूपयांवर जात नाही. मग त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम वगैरे होणे शक्य नाही. आताचाही निर्णय असाच! काल मोदी सरकारने लाल दिवाबंदी केली.

सामान्यांच्या दृष्टीने या लाल दिव्याला असलेली प्रतिष्ठा आधीच संपली होती.उरली-सुरली पत लोकशाहीतील झुंडशाहीच्या माध्यमातून या गाड्या पटकावणार्‍यांनी धुळीस मिळवली होती. त्यामुळे आजकाल लाल दिव्याची गाडी रस्त्यावर धावताना दिसली की आदर कमी आणि नको त्या शब्दाचा मनातल्या मनात गजरच अधिक व्हायचा! देशातील राजसत्ता लोकशाहीच्या रुजवातीसोबत संपली होती. मात्र या लाल दिव्याने पुढे अनेक संस्थानिक देशाला दिले.

एकाअर्थी सत्ता, संपत्ती आणि मग्रुरीचे प्रतीक म्हणूनही या दिव्याची ओळख झाली होती. त्यामुळे कधीतरी तो विझावा, ही इच्छा सामान्य भारतीय बाळगून होताच! आधी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, मग पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्रमाने हा दिवा त्यागून एक नवा मार्ग दाखविला होता. त्यामुळे इतरांनी प्रेरणा घेवून तो त्यागने अपेक्षीत होते. पण भारतीय राजकारण्यांचे खुर्ची आणि लाल दिवा प्रेम सुटणे तसे कठीणच! आता मोदी सरकारने लाल दिवा बहाल करणारा कायदाच रद्द करून टाकल्याने आता मंत्र्यांसह अधिकार्‍यांच्या डोक्यावरील दिवे 1 मेपासून गायब होणार आहेत. ही नवी सुरूवात म्हटली पाहिजे. एक चांगला निर्णय म्हणून याची नोंद आवश्यक आहे. राजकारणी हे अनेक प्रथांचे जनक असतात. त्यांच्या लाल दिव्यांमधून प्रेरणा घेत अनेकांनी आपल्या गाड्यांवर व्यवसायदर्शक स्टीकर किंवा पाट्या लावण्याची हौस भागवून घेतात. आपापल्या व्यवसायानुसार गाड्यांवर ही चिन्हे उमटवून घेण्याचा अनेकांना भारी सोस असतो.

डॉक्टर, वकील आणि माध्यमकर्मीची गाडी सहज ओळखता येते. काही तथाकथीत समित्यांचे अध्यक्षांच्या गाडीवरील फलक तर त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेपेक्षा मोठा असतो. नियमभंग केला की या चिन्हांच्या आधारे व्यवस्थेवर दबाव टाकण्याची वृत्तीही राजकारण्यांसारखीच! प्रिंटीग प्रेसमध्ये काम करणारेही अनेक आपल्या गाड्यांवर प्रेस उमटवून गाड्या दामटत असल्याची उदाहरणेही कमी नाहीत. अर्थात नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे यातही काही सन्माननीय अपवाद आहेत. आता राजकारण्यांच्या डोक्यावरील दिवा उतरला आहे. तेव्हा समान्य जनतेतील या अतिविशेषांनी (व्हीव्हीआयपी)आपल्या डोक्यातील पदांचा कैफ बाजूला काढून ठेवलात सामान्यांना अधिकच आनंद होईल!

… अनंत पाटील 

LEAVE A REPLY

*