शेवगावात दुचाकी चोर जाळ्यात : दोघांकडून 13 दुचाकी व सुट्टे भाग हस्तगत

0

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेवगाव पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक केली असुन त्यांच्याकडुन 13 दुचाकी व काही सुटे भाग जप्त केले आहेत. या आरोपींकडुन आणखी काही दुचाक्या हाती लागण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी व्यक्त केली आहे. या चोरट्यांनी शेवगाव, पाथर्डी, राहुरी, अहमदनगर, शिरुर, शिक्रापुर, वाघोली येथुन दुचाकीवर डल्ला मारलेला आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील अमोल बांदल हा लगतच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील तर त्याचा साथीदार किशोर सरोदे हा शेवगाव तालुक्यातील वडुले वाघोली येथील आहे. पोलीस दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचा शोध घेत असताना दि. 9 ऑगस्टच्या रात्री 8 च्या सुमारास बांदल हा मिरी रस्त्यावरुन जात असतांना संशयावरुन पोलिसांनी त्यास हटकले. यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत त्याच्याकडे असलेली स्पेंडर दुचाकी (क्रमांक एमएच 12, एझेड. 2575) ही चोरुन आणल्याचे त्याने कबुल केले. त्यास न्यायालयात उभे केले असता न्यायाधिशांनी 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या काळात पोलीस तपासात त्याने चोरलेल्या व विक्री केलेल्या व काही बेवारस सोडुन दिलेल्या दुचाकींची माहिती दिली. ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
त्याचा साथीदार सरोदे यास पोलिसांनी संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने विविध ठिकाणावरुन दुचाक्या चोरल्याचे कबुल केले आहे. यामुळे आणखी काही दुचाकी वाहने हस्तगत होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी व्यक्त केली आहे.
या जप्त केलेल्या दहा दुचाक्यांवर नोंदणी क्रमांक आहेत. तर तीन दुचाक्या विना क्रमांकाच्या आहेत. यामध्ये 8 स्प्लेंडर, 3 पॅशन, 1 ड्रीम युगा तर 1 स्टार सिटी या दुचाकींचा समावेश आहे. पोलिसांकडे या वाहनांचे चेसी क्रमांकही आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, उपअधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक सुहास हट्टेकर, पोलीस कर्मचारी महंमद युसुफ सय्यद, बाबासाहेब अकोलकर, अशोक बागुल, राहुल नरवडे, राजु चव्हाण, सुरेश टकले, अशोक काळोखे, रवीद्र शेळके, वजीर शेख, राजेंद्र केदार यांच्या पथकाने केली.

तालुक्यातील काही इतर दुचाकी चोरट्यांना यापुर्वीही पोलीसांनी पकडले होते. तरीही शहरातुन दुचाकी चोर्‍यांचे सत्र चालुच असते. तालुक्यात अशा किती टोळ्या कार्यरत आहेत हा प्रश्नच आहे. दुचाकी चोरी गेल्यानंतर पश्चातापाची वेळ संबंधितावर येते. यामुळे दुचाकी स्वारांनी दुचाकी वाहने सुरक्षित ठिकाणी उभे करणे गरजेचे आहे. तसेच पोलीस दलाने ही चोरीची वाहने कमी किंमतीत विकत घेणार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. यामुळे चोरीचे वाहने विकत घेणार्‍यांवर काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल व चोरट्यांना अपेक्षित ग्राहक मिळण्यास अटकाव होईल.

LEAVE A REPLY

*