भंडारदरा येथे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण

0
भंडारदरा (वार्ताहर) – निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असणार्‍या व निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा परिसरात वेगवेगळ्या ऋतुमध्ये अनोखे चमत्कार पर्यटकांना पाहावयास मिळत असतात.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापासुन ते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहापर्यत पिवळ्या रंगाची सोनकी व खुरासनीची फुले घाटघर, रतनवाडी , भंडारदरा परिसरातील हिरव्यागार डोंगरदर्‍यांत रानात पसरल्याने निसर्गसौंदर्यात आणखीन भर पडली असल्याने पर्यटकांना आकर्षित करु लागली आहे.
पावसाचा जोर काहीसा कमी होतो. सगळीकडे पावसाने राज्य केल्यामुळे हिरवळीने सह्याद्रीची पर्वतरांग नटुन बसली आहे. हिरवाकच दिसणार्‍या या हिरवळरुपी शालीला आता रानफुले व गवतफुलांची झालर बसविली असुन अनेक प्रकारची निसर्गाची देन असलेली फुले कळसुबाईच्या शिखरावर तसेच रतनगडाच्या सभोवताली थाटात डोलत आहेत.
सोनकळीच्या फुलांनी संपुर्ण जंगलालाच सोन्याचा मुलामा चढविल्यागत भास होताना दिसत आहे. भंडारदर्‍याच्या परीसरात अनेक प्रकारची गवत फुले व रानफुले ही उगवली असुन निसर्गाचा हा अद्भुत असा देखावा पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करु लागले आहेत.
रतनगडाच्या पायथ्याचा संपुर्ण परिसर रानफुलांनी बहरुन गेला आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठी दरी समजल्या जाणार्‍या सांदन दरीचा आंनद घेण्यासाठी आलेले शेकडो पर्यटक या फुलांची मनमोहक अदा आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी आतुर झाले आहेत.
या फुलामध्ये कारव्यासारख्या झाडाला सातवर्षातुन एकदाच फुल येत असुन या कारव्याच्या झाडाचा उपयोग घरबांधणीसाठी व वाळल्यानंतर सरपणासाठी केला जातो. काही फुलांचा वापर आदिवासी बांधव आपले श्रद्धास्थान असलेल्या देवदेवतांना अर्पण करण्यासाठी करतात तर काही फुलांचा वापर हा ठराविक आजारावर औषधासाठी केला जातो.
रिंगरोडवर पर्यटन करताना कितीतरी लहान लहान मुलं हातात रानफुले घेऊन पर्यटकांना विकत घेण्यासाठी आमंत्रण देताना दिसत आहेत.
ज्याप्रकारे भंडारदर्‍याला पावसाअगोदरचा काजवामहोस्तव व पावसाळ्यातील जलोस्तवाला पर्यटकांची असंख्य पर्यटक भेट देतात अशीच पर्यटकांची साथ फुलोस्तवाला मिळाली तर भंडारदरा महाराष्ट्रातील दुसरे कास पठार म्हणुन ओळखला जाईल.

सोनकी, तेरडा, ब्लुमिया, कळलावी, उंबर, शंखपुष्पी, रानमेथी, कुंभी, पांगरा, कारवा, कर्दळी, चापटा अशी नाना प्रकारची रंगीबेंरगी जंगली फुले अभयारण्यामध्ये फुलु लागली आहेत – डी.टी.पडवळे (वनक्षेत्रपाल, भंडारदरा )

 

LEAVE A REPLY

*