नाशिक बार असोसिएशनला आयएसओ मानांकन

९००१ मानांकन मिळवणारा देशातील पहिला वकिल संघ

0
नाशिक | दि. २४ प्रतिनिधी – नाशिक बार असोसिएशन या जिल्ह्यातील वकीलांच्या संघटनेला आयएसओ ९००१ – २०१५ चे मानांकन मिळाले असून असा बहुमान मिळविणारा हा देशातील पहिला वकील संघ ठरल्याचा दावा संघटनेने केला आहे. जिल्हा न्यायालयातील जुन्या लायब्ररी सभागृहात झालेल्या छोटेखानी सोहळ्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश यांच्या हस्ते ९००१ मानांकनाचे प्रमाणपत्र संघटनेच्या पदाधिकार्‍यांना प्रदान करण्यात आले.

 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ठाकरे यांच्यासह उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, सचिव सुरेश निफाडे, खजिनदार हेमंत गायकवाड सहसचिव जालिंदर ताडगे आदी उपस्थि होते. यावेळी बोलताना न्या. ढवळे म्हणाले, नाशिक बार असोसिएशन या एकमेव संघटनेला देशात पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला याचा अभिमान वाटतो. वकीलांच्या संघटनेलाही अशा प्रकारचे मानांकन मिळू शकते हे माहीत नव्हते. संघटनेच्या कामाची पावती म्हणून हे मानांकन मिळाले आहे. संघटनेने वकीलांना प्रशिक्षण देऊन त्यातून चांगल्या दर्जाचे न्यायाधिश घडविले आहेत. असे कार्य यापुढेही सुरू ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बार असोसिएशनने सभासदांसाठी बनविलेल्या ओळखपत्रांचे यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. गुणवत्ता, एकसंघता आणि पारदर्शकता यांसारखी वैशिष्टये जपणार्‍या संस्थांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक संघटना, संस्था, आणि खासगी आस्थापनांनी अशा प्रकारचे मानांकन प्राप्त केले आहे. परंतु वकीलांच्या संघटनेला अद्याप कोठे आयएसओ मानांकन प्राप्त नव्हते.

नाशिक जिल्हा ऍडव्होकेट बार असोसिएशनने त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हे मानांकन देण्यापुर्वी या संघटनेचे पाच ते दहा वर्षापुर्वीच्या आर्थिक व्यवहारांचे ऑडीट झाले. संघटनेचा एकंदरीत कारभार तपासण्यात आला. वकीलांसाठी संघटना कोणकोणते उपक्रम राबविते याची माहिती घेण्यात आली. वकीलांमधील सहकार्याची भावना, सन्मान वाढविणे, वकीलांच्या हक्कांचे रक्षण करणे यांसारख्या बाबी तपासल्यानंतर हे आयएसओ प्रदान करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली.

चोख कार्याची पावती
नशिक बार असोसिएशन हे आयएसओ ९००१ हे ंप्रमाणपत्र मिळवणारी पाहिली वकिल संंघटना ठरली आहे. आतापर्यंत बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मनापासून केलेल्या कार्याची ही पावती असून याचा आम्हा सर्वांनाच अभिवामन आहे.
– नितीन ठाकरे , अध्यक्ष नाशिक बार असोशिएशन
लवकरच संकेतस्थळ
नाशिक बार असोसिएशनने सभासदांची माहिती असलेली वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या वेबसाईटवर वकीलाचे नाव, छायाचित्र, त्याचे शिक्षण, पत्ता, तो कोणत्या स्वरुपाची वकीली करतो याबाबतच्या इत्यंभूत माहितीचा समावेश असणार आहे. पक्षकारांना तसेच अन्य नागरिकांनाही वकीलांबाबतची तसेच बार असोसिएशनची माहिती सहजगत्या मिळावी या यामागचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

*