माजी मंत्री पिचड जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

0
कोतूळ (वार्ताहर) – माजी मंत्री व आदिवासी समाजाचे राष्ट्रीय नेते मधुकरराव पिचड यांना आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जागतिक आदिवासी दिनी कल्याण येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारधी महासंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब साळुंखे होते.
माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या 50 वर्षाच्या सामाजिक लढ्याचा तसेच राजकीय कारकिर्दीचा ऊहापोह करून त्यांना गौरवार्थ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आदिवासींच्या 45 जमातींचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी यासाठी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात यावे व कल्याण येथे आदिवासी भवनाची निर्मिती करण्यासाठी महापौरांना प्रत्यक्ष भेटून प्रस्ताव सादर करावा असे दोन ठराव यावेळी मांडण्यात आले.
यावेळी अशोक आत्राम, पुष्पाताई चव्हाण, वसंत पिचड, मुरलीधर पिचड, रमेश परचाके, राणा सोनवणे, नगरसेविका शीतल मंडारी, प्रकाश घिगे, दिनेश पटेकर(जव्हार), बापूराव जुमनाके (चंद्रपूर), विनोद मसराम(अमरावती), सीताराम शिंदे, भिवा भांडकोळी, रमेश पवार, जैतू खवला आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजू पोपेरे, पांडुरंग झमबाडे, सुधीर घिगे, सुरेश भवारी, रोहिदास साबळे, किसन रोंगटे, सुनील शिंदे, जगदीश गोडे, संजय हिले, चंदू भवारी, अजय भोजने, अभिषेक भोजणे, राजेश घोडे, श्रीमती संगीता भोजणे, नवाळे, सुनंदा भांगरे, रंजना पारधी, मीनाक्षी भवारी यांनी परिश्रम घेतले. आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महासचिव राम चव्हाण यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन श्री. मोहरे व रत्ना हिले यांनी केले. कोकण विभागीय अध्यक्ष रामनाथ भोजणे यांनी आभार मानले.

धनगरांना आदिवासीत घुसखोरी करू दिली नाही : पिचड –
नागपूरच्या मोर्च्यात 112 गोवारी बांधव मरण पावल्याचे दुःख अजूनही आहे. आदिवासींच्या भल्यासाठी आदिवासी मंत्रिपदाचा त्यावेळी राजीनामा दिला. अशा अनेक प्रसंगांना तोंड दिले आणि यामुळेच आम्ही आत्तापर्यंत धनगरांना आदिवासींत घुसखोरी करू दिली नाही. पुढेही करू देणार नाही. अन्य संस्थेने आदिवासींचा अहवाल तयार करणे हेच मुळात चुकीचे आहे. त्यासाठी शासनाची TRTI ही संस्था आहे. अनेक बोगस आदिवासींनी घुसखोरी केलेली आहे त्या सर्वांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 च्या निर्णयाच्या आधारे शिक्षा झाली पाहिजे. आदिवासींच्या प्रश्नांसाठी आपला लढा शेवट पर्यंत चालू राहील असे माजी मंत्री पिचड़ यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. 

LEAVE A REPLY

*