पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी 19 जण ताब्यात

0

कुरणमध्ये हल्लेखोरांची धरपकड; घटनेच्या निषेधार्थ बाजार बंद

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुरण येथे कारवाईसाठी गेलेल्या शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना झालेल्या धक्काबुक्की व पोलीस कर्मचार्‍यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे 3.30 ते 6 दरम्यान कुरण गावात पोलिसांनी धरपकड मोहिम राबविली. यामध्ये 19 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कुरण येथे एका गोठ्यात भाकड जनावरे आहेत व ती कत्तलीसाठी विकली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे हे कर्मचार्‍यांसह कुरण येथे गेले. मात्र कारवाई करत असतांना ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला.
पोलीस व ग्रामस्थ यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना धक्काबुक्की तर पोलीस कर्मचारी अशोक सुपे, विठ्ठल गायकवाड यांना बेदम मारहाण झाली. याप्रकारामुळे कुरण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 100 ते 150 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काल पहाटे 3.30 ते 6 या दरम्यान धरपकड मोहिम राबविण्याचे ठरले.
त्यासाठी संगमनेर उपविभागातील राहुरी, शिर्डी, लोणी, आश्‍वी, घारगाव, अकोले, राजूर, संगमनेर शहर, संगमनेर तालुका येथील मोठ्या प्रमाणावर फौजफाटा बोलविण्यात आला. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कुरण गावात धरपकड मोहिम राबविली. त्यामध्ये 19 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे करत आहे.
कुरणच्या घटनेचे पडसाद बाजार समितीवर
दरम्यान या घटनेचे पडसाद दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी उमटले. संगमनेर बाजार समितीमध्ये काही व्यापार्‍यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजार बंद पाडला. त्यामुळे शेतकरीही संतप्त झाले. अखेर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, सचिव सतीश गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे व व्यापारी यांच्यात बैठक झाली. पोलिसांनी ज्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये टोमॅटो व्यापारी आहेत. त्यामुळे काही व्यापार्‍यांनी एकत्र येत शेतकर्‍यांचा माल घेण्याचा बंद केला. कुरण येथे घडलेल्या घटनेमध्ये शेतकर्‍यांची अडवणूक कशासाठी? असा सवालही काही शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

कुरण गावामध्ये काही खाटीक जनावरे एकत्रित बांधून ठेवलेली आहे. आणि त्यांची कत्तलीसाठी पाठविली जाणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मिळाली. त्यानुसार ते पोलीस कर्मचार्‍यांसह रवाना झाले. कुरणमधील एका डाळींबाच्या शेताजवळील गोठ्यात काही जनावरे आढळून आली. तेव्हा ती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कायदेशिर कारवाई सुरु केली. सदर जनावरे पांजरपोळला जमा करतो, ही जनावरे कत्तलीसाठी जाणार नाही व त्यावरील मालकी हक्क सिद्ध करा आणि त्यानंतर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तेथील गोठा मालक व इतर लोक एकत्र आले व त्यांनी पोलिसांना कारवाईपासून रोखले. त्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ वर्पे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 116/17 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  सदर घटनेत काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.  कुरण ग्रामस्थांनी देखील पोलीस निरीक्षकांवर काही आरोप केले आहे. त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. – डॉ. अजय देवरे, डीवायएसपी, संगमनेर

LEAVE A REPLY

*