राहुरी व नेवाशातील दरोडेखोर जेरबंद

0

पिस्तुल, काडतूसे, मिरचीपुड, दांडे जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी ते सोनई रोडवर मुळा पब्लीश स्कुलच्या पाठीमागे राहुरी व नेवाशाचे पाच दरोडेखोर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेन अटक केले आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तुल, दोन काडतूसे, मिरचीपुड व सुती दोरी असा दरोडे टाकण्यास उपयुक्त असणार मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन शहाबुद्दीन शेख (रा. बोल्हेकरवाडी, ता. नेवासा), अजिज बशीर शेख (रा. चांदा, ता. नेवासा), राहुल दिलीप ढोकणे (रा. ब्राम्हणी. ता. राहुरी), काल्या उर्फ रशीद शब्बीर शेख व पप्पु उर्फ महेश जालिंदर ढोकणे (रा. उंबरे. ता. राहुरी) अशी पाच जणांची नावे आहेत. गुरूवारी (दि.3) पहाटे सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्टे हे राहुरी व नेवासा तालुक्याच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत होते. सोनई रोडवर मुळा पब्लीश स्कुलच्या जवळ असताना त्यांना खबर मिळाली की; काही चोरटे दरोड्याच्या तयारीत दबा धरुन बसले आहेत. त्यांच्याकडे पिस्तुल, काडतुसे व अन्य हत्यारे आहेत.

या पथकाने पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपींचा पाटलाग सुरू केला. शाळेच्या जवळच पाच तरूण तोंड बांधून हातात लाकडी दांडे घेऊन उभे होते. पोलिसांनी त्यांच्यावर झडप मारली असता दरोडेखोरांची मोठी तारांबाळ उडाली. पाचही दरोडेखोरांचा पाटलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल, दोन काडतूसे, मिरचीपुड व सुती दोरी असा दरोडे टाकण्यास उपयुक्त असणार मुद्देमाल मिळून आला.

आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आज पाचही दरोडेखोरांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना पुढील चौकशीसाठी मंगळवार 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून अन्य गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या कारवाईत फकिर शेख, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, रविंद्र कर्डीले, सागर सुलाने, संभाजी कोतकर यांचा सामावेश होता.

सकाळी वाहन चालक, संध्याकाळी दरोडेखोर –  राहुरी, नेवासा, घोडेगाव व सोनई ही एक गावठी कट्ट्यांची खाण असल्याचे बोलले जाते. मध्यप्रदेशातून येणार्‍या वाहनांमध्ये या पिस्तुलांची तस्करी होते. उंबरी गावातील या दरोडेखोरांवर ही कारवाई झाली असली तरी पोलिसांनी या आरोपींकडे कसून चौकशी केल्यास त्यांच्याकडून अणखी कट्टे व दरोडेखोरांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या तरुणांची एक टोळी सक्रीय असून त्यात अनेकजण वाहन चालकाची कामे करतात तर संध्याकळी दरोडे टाकण्यात ते सराईत झाले आहेत. यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाला खमकी भूमिका घ्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*