साईबाबा पतसंस्थेचा अध्यक्ष बबन भोसले यास अटक

0

सहा दिवसांची पोलीस कोठडी

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पतसंस्थेचा अध्यक्ष बबन राजाराम भोसले यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भोसले यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेमधील सभासद व ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवीच्या रकमा मिळत नसल्यामुळे या संस्थेच्या संचालक मंडळाकडे ठेवीदारांनी रकमेसाठी तगादा सुरू केला. त्यानंतर संस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचे पुढे आले.
लेखापरीक्षक संतोष पंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे व्यवस्थापक रावसाहेब कारभारी टेकुडे (रा. काळेवाडी) व रोखपाल सीताराम मनोहर शेंडगे (रा. मांडवे बुद्रुक) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर देखील ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ठेवीदार भीमराज जाधव व इतर ठेवीदारांनी सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
निवेदनात म्हटले होते, की पतसंस्थेचे अध्यक्ष बबन राजाराम भोसले याने ठेवीदारांचा विश्‍वासघात करून घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे भोसले याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. संस्थेमधून आर्थिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष बबन भोसले यास पोलिसांनी सहआरोपी करत अटक करण्यात आली आहे.
काल गुरुवारी बबन भोसले यास संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

असा झाला घोटाळा  – साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत व्यवस्थापक, रोखपाल, अध्यक्ष यांनी संगनमताने अधिकाराचा दुरुपयोग केला. त्यांनी काही पावत्यांवर, धनादेशांवर खोट्या सह्या करून संस्थेची दोन कोटी 16 लाख 61 हजार 916 रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणा न करता हडप केली. तसेच संस्थेचे खाते असलेल्या वेगवेगळ्या बँकेतून संस्थेच्या डे बुकला नोंदी न करता व जिल्हा बँक शाखा साकूर येथील लॉकरमध्ये ठेवलेले संस्थेचे सोन्याचे दागिने परस्पर काढून घेऊन त्याचा अपहार केला.

LEAVE A REPLY

*