पोलीस अधिकार्‍याच्या पुत्राचा गूढ मृत्यू

0

सावेडीत खळबळ, हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती

अहमदनगर (प्रतिनिधी) – चेहरा, मानेवर खोलवर जखमा असलेला मृतदेह आज पहाटे सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावर हॉटेल सागरसमोर मिळून आला. मृत्युचे कारण स्पष्ट होत नसल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. या गूढ मृत्यूची विविधांगाने चर्चा सावेडीसह शहरात सुरू आहे. काहींच्या मते मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गायकवाड यांचा मृत्यू झाला असावा. मात्र झालेल्या जखमा पाहता हा कुत्र्यांचा हल्ला नसावा, वेगळेच काहीतरी घडले असावे अशीही चर्चा सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

अरुण साहेबराव गायकवाड (वय, 45, रा. गुलमोहर रोड) असे मृताचे नाव आहे. मृत अरुण हे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक साहेबराव गायकवाड यांचा मुलगा असून साहेबराव गायकवाड यांचाही मृत्यू झालेला आहे.
पाईपलाईन रस्त्यावरील सागर हॉटेलसमोर अनोळखी मृतदेह असल्याची माहिती भल्या सकाळी पोलिसांना कळाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृतदेहाच्या कानावर, डोळ्यावर, मानेवर खोलवर जखमा झाल्या होत्या.

चेहरा विद्रुप असल्याने मृतदेहाचे ओळख पटविण्यासही पोलिसांना विलंब झाला. स्थानिकाच्या माहितीनंतर पोलिसांना मृतदेह हा अरुण गायकवाड यांचा असल्याचे समजले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात धाव घेतली, मात्र तेथेही मृत्युचे कारण स्पष्ट होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दुपारनंतर मृतदेह पोलीस पुण्याकडे घेऊन निघाले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार अरुण गायकवाड हे सागर हॉटेलमध्ये गेले होते. तेथे ते बराचवेळ बसल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यानंतर हॉटेलमधील कामगारांना त्यांना हॉटेलबाहेर आणून बसविले. हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले आहे. हॉटेलबाहेर नेमके काय घडले याचे चित्रण नसल्याने मृत्यु नेमका कशाने झाला याबद्दल संभ्रम आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण कळेल, त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.

अरुण गायकवाड यांना कामगारांनी हॉटेलबाहेर ठेवल्यानंतर दोन कर्मचारी त्यांच्या घरी निरोप घेऊन गेले होते. मात्र गायकवाड कुटुबियांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ते तेथेच पडून होते. सकाळी त्यांच्या मृत्युची माहिती मिळाल्यानंतर गायकवाड कुटुंबिय तिकडे पोहचले.

अरुण गायकवाड यांचा मृत्यू मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात झाला की कसा याचा तपास तत्काळ करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे, नगरसेवक संपत बारस्कर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निखील वारे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सचिन लोटके, विशाल शिंदे, स्वप्नील ढवण, नितीन लिगडे यांनी पोलिसांकडे केली आहे.

छडा लावण्याचे आव्हान
अरुण गायकवाड यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचे कारण शवविच्छेदनानंतर समोर आले तरीही चेहर्‍यावरील खोल जखमा कशामुळे झाल्या, कोणी केल्या याचे गुढ शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मृतदेहाभोवती कुत्र्यांच्या पावलाचे ठसे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र खोलवर झालेल्या जखमा पाहता ती शक्यताही पोलिसांनी फेटाळून लावली. मृतदेहावरील जखमा पाहता मृत्युचे कारण संशयास्पद असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले आहेत.

LEAVE A REPLY

*