समृध्दी महामार्गासाठी थेट जमिन खरेदीला विरोध

0

शेतकरी किसान सभा व बाधीत शेतकरी करणार अधिसूचनेची होळी

 

सोनेवाडी (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील दहा गावातील बाधित शेतकर्‍यांनी नागपूर मुंबई समुद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या थेट जमिन खरेदीला विरोध दर्शवित प्रांत कार्यालयाच्या अधिसूचनेवर हरकती घेत कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सदर अधिसूचनेची होळी 22 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता करणार असल्याचे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.
निवेदनावर शिर्डी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे, संघटक कॉ. बाबा शेख, कार्याध्यक्ष कॉ. प्रा. एल.एम. डांगे, हनुमंत भोंगळे, शंकरराव चव्हाण, मतीन शेख, गंगाधर भोंगळे, चांगदेव भोंगळे, भाऊसाहेब जोशी, कुंदन थोरात, भाऊसाहेब आंबीलवादे, कारभारी काजळे, माधव गायकवाड, भास्कर होन, साहेबराव होन आदी शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. कोपरगाव तालुक्यातील दहा गावातील शेतकर्‍यांची हजारो एकर बागायती जमिन सरकार मुंबई नागपूर समुद्धी महामार्गासाठी संपादित करणार आहे. शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

 

तरी देखील या महामार्ग प्रकल्पासाठी लागणार्‍या शेत जमिनी शेतकर्‍यांकडून थेट खरेदी पध्दतीने मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे यांनी अधिसूचना जारी केली आहे. मात्र या प्रकल्पातील बाधीत शेतकरी व शेतकरी किसान सभेला हे मान्य नसून बाधीत शेतकर्‍यांनी अधिसूचने विरूद्ध हरकती दाखल केल्या आहेत. या अधिसूचनेचा बाधीत शेतकर्‍यांनी तीव्र निषेध केला असुन अधिसूचनेची होळी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रति कोपरगाव पोलीस स्टेशन, सेक्रेटरी आखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आल्या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*