BLOG : आगे बढो!

0

बारावीच्या निकालात प्रगती आणि केरळात दाखल झालेला मान्सून अशा दोन सुवार्ता एकत्र येणे तसे आनंददायी!

काहीच चांगले कानावर पडत नसताना धीर देणार्‍या आणि उत्साह वाढविणार्‍या घटना म्हणूनही याकडे बघता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने बारावीचा निकाल आज जाहीर केला. राज्यातील विद्यार्थ्यांनी 2 टक्के प्रगतीसह 89.50 निकालाची नोंद केली आहे.

पुन्हा एकदा विद्यार्थीनींनी सर्वोत्तम निकालात आघाडी घेतली, हे देखिल अपेक्षीत आणि आशादायी! थोड्याबहुत अंतराने राज्यातील सर्वच विभागांनी आपली प्रगती कायम राखली आहे. जीवनातील यशाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावी, बारावीच्या निकालांचे महत्त्व आजही कायम आहे.

करिअरच्या या टप्प्यावर निर्माण होणार्‍या मानसिक द्वंदाला निर्णायक दिशा देणारा हा परिणाम! कोणत्याची गोष्टीला दोन बाजू असतात. निकालाच्या आनंदामागेही आहेत. सध्या देशात आणि राज्यात ‘प्रगती’चे जे आकडे समोर येताहेत त्या पार्श्‍वभूमीवर यशस्वी विद्यार्थ्यांनी सजग राहून पुढील निर्णय घ्यावा, अशी स्थिती आहे.

पुढील काळात सरकारी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी होतील. सारी मदार खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांवर! त्यातही सेवाक्षेत्र आघाडीवर. पण अलिकडच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. सेवाक्षेत्रात प्रचंड घसरण आहे. हजारोंच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. आपल्या जिल्ह्यात नजर टाकली तरी परिस्थिती फार वेगळी नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयांना टिकणे अवघड होऊन बसले आहे.

अर्थात त्याला अनावश्यक वाढलेली अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आणि या महाविद्यालयांचा घसरलेला स्तरही कारणीभूत आहेच! पण म्हणून प्रश्‍न संपत नाही. एकूणच देशात दरवर्षी निर्माण होणार्‍या नोकर्‍यांची संख्या कमालीची घसरली आहे. तसे अहवालच अनेक संस्थांनी पुढे केले आहेत. भविष्यात काय स्थिती असेल, याचा अंदाज नाही. या स्थितीत गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांनी अत्यंत सजगपणे पुढील शिक्षणाची दिशा ठरवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा कल, कौशल्य तपासणी आणि त्यांना मार्गदर्शन या स्तरावर आजही आपली स्थिती यथातथाच! मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेलही. पण नगरसह अन्य शहरांबाबत आजही स्थिती आशादायी नाही. आजही दादा, ताई, बाबा आणि मित्रांना काय वाटते, यावरच करिअरची दिशा ठरविण्याची पद्धत रूढ आहे. ती पूर्णपणे सदोष आहे, असेही नाही. पण ती पूर्णपणे निदोष नाही, हे समजून घेतले पाहिजे. यापुढे केवळ नोकरीऐवजी स्वत:चा उद्योग स्थापन करण्यास तयार असलेली पिढी घडवावी लागेल. शाळा-महाविद्यालयांपासूनच याची तयारी झाली पाहिजे. असो! विद्यार्थ्यांनी त्यांचे काम फत्ते केले आहे. उत्तम निकाल हाती आला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांना पुढील दिशा उत्तम मिळो!

LEAVE A REPLY

*