खरिपासाठी 553 कोटीचे कर्ज वाटप

0

कृषीकडून नियोजन सुरू;  6 लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित  मशागतीला आला वेग

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदाच्या खरीप हंगामात पीके उभे करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 553 कोटी रुपयांचा शेतकर्‍यांना आतापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे 1400 कोटी रुपये कर्ज वाटपाचे यंदा उद्दिष्ट आहे.
शेतकरी सभासदांना कर्ज घेण्यासाठी 30 जून 2017 अखेरपर्यंत मुदत आहे. यामध्ये ऐनवेळी वाढीव मुदत देण्यात येण्याची शक्यता आहे.सध्या शेतीमालाला न मिळणारा हमीभाव यामुळे शेतकर्‍यांना उत्पादन खर्च फेडण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाला तोंड दिल्यावर गतवर्षीच्या अखेरीस पावसाने कृपादृष्टी केली.त्यामुळे अवंदा शेतकर्‍यांना मोठ्याप्रमाणात उत्पादन घेता आले आहे.

 

मात्र, कवडीमोल बाजार भावाने कृषीमाल विकण्याची वाईट वेळ शेतकरी राजावर येऊन ठेपली आहे. पूर्वीचाच उत्पादन खर्च फिटण्याचा प्रश्‍न समोर असताना आगामी खरीप हंगामाचे नियोजन नेमके कसे करावे.असा यक्षप्रश्‍न शेतकर्‍यासमोर उभा आहे. त्यामुळे कर्ज घेण्याची पात्रता असणार्‍या शेतकर्‍यांनी मशागत, खते,बि-बियाणे खरेदीसाठी सहकारी बँकेचे दार ठोठावून कर्ज घेतले. यामध्ये कर्जाची गरज असतानाही काहींना थकबाकीमुळे कर्ज घेता येणार नसल्याने आर्थिक भांडवल उभे करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कर्जमाफीच्या चर्चेमुळे अनेकांनी कर्ज घेण्याची इच्छा असतानाही माफ होण्याच्या आशेवर बसून कर्ज न घेणेच पसंत केल्याने यंदा उद्दिष्टापेक्षा कर्जपुरवठा कमी होण्याचा अंदाज आहे.
कृषी विभागाकडून खरीप हंगाम नियोजनाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा जिल्ह्यात 6 लाख 7 हजार क्षेत्र प्रस्तावित आहे.त्यापैकी 4 लाख 24 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. कृषीपाठोपाठ शेतकर्‍यांनी जमिनीची मशागतीसाठी लगबग सुरु केली आहे.मात्र, पेरणी व लागवडीसाठी शाश्‍वत पाण्यासाठी अद्याप पावसाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे.यंदा ऊस, बाजरी, कापूस या पिकांकडे शेतकर्‍यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

 

गत दोन वर्षात शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली.मुबलक प्रमाणात पाणी आहे.मात्र, घेतलेल्या पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आहे.वारंवार अपयश येऊन सुध्दा धिर धरणार्‍या बळीराजाने पुन्हा एकदा खरीपाची जोमाने तयारी करण्यासाठी कंबर कसली आहे. शेतीची मशागत करून रान पेरणी व लागवडी योग्य करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले जात आहे. शेतामध्ये पिके उभे राहण्यासाठी मात्र, पावसाची प्रतीक्षा आहे.

 

पॉसव्दारे खतांची विक्री
खरीप हंगामासाठी 2 लाख 74 हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली असून 1 लाख 86 हजार मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे.सदर खतांची विक्री पॉस मशिनव्दारे करण्यात येणार आहे.विविध रासायनिक खतांवर अनुदान असल्यास त्याचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक महत्त्वाचा आहे. त्यासाठी 534 मशिन वाटप करण्यात आले आहे.

 

7 लाख क्किटल बियाणे उपलब्ध
यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात एकूण 7 लाख 9 हजार 456 क्किंटल बियाणे खासगी, महाबीजकडे उपलब्ध आहेत.कपाशीची 1 लाख 15 हजार क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यादृष्टिने बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 33 हजार बियाणे पाकीटे उपलब्ध आहे. यामध्ये कणक, एमआरसी, अजीत 155 आदी वाणांचाही समावेश आहे.

 

टोकण पध्दतीने लागवड फायदेशिर
खरीप हंगामात सोयाबीन, तूर आदी पिकांसाठी टोकण पध्दतीने लागवड करावी. हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये कपाशी बिटी वाणाची लागवड करू नये.याशिवाय पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त दोन पाणी उपलब्ध स्त्रोतामध्ये असणे अपेक्षित आहे. त्यामुळे शंभर टक्के पीक येण्याची खात्री राहते.अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*