पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम

0

काल संप मागे घेण्याची घोषणा होऊनही पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी सरकारविरोधी संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपाची सर्व सूत्रे पुणतांब्यातून हलवण्यात येत होती. मात्र, सरकारशी समझोता केल्यानंतर या कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमध्येच वाद निर्माण झाले आहेत.

त्यामुळे आता नाराज शेतकऱ्यांच्या गटाने पुणताब्यांत कोअर कमिटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं आहे.

संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही ,अशी भूमिका घेत नाराजांच्या गटाने संपाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

याठिकाणच्या गावकऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यापेक्षा अधिक मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यापेक्षा कमीच मागण्या मान्य झाल्या, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

तसेच संप मागे घ्यायचा किंवा नाही याचा निर्णय ग्रामसभेत होणार होता.

मात्र कोअर कमिटीने परस्पर संप मागे घेत असल्याचे जाहीर केल्याने, आम्ही त्यांचा निषेध करतो, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुणतांब्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संपाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

*