Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरऑपरेशन मुस्कानअंतर्गत 1100 व्यक्तींचा शोध

ऑपरेशन मुस्कानअंतर्गत 1100 व्यक्तींचा शोध

अहमदनगर (प्रतिनिधी) –

1 ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत पोलिसांनी बालके, महिला व पुरूष अशा एक हजार 88 जणांचा शोध

- Advertisement -

घेतला आहे. तर रेकॉर्डवर नसलेल्या 47 बालके मिळून आली असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्यांमध्ये ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात आली. यासंदर्भात केलेल्या कामगिरीची माहिती अधीक्षक पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. बालकांचे अपहरण केल्याचे जिल्ह्यात 200 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 77 बालकांचा ऑपरेशन मुस्कान मोहिमेत शोध घेण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एक हजार 210 महिलांपैकी 621 व एक हजार 91 पुरूषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आला. पोलिसांची मोहिम सुरू असताना नगर शहर व जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड बाहेरील 47 मुले पोलिसांना मिळून आली. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

हरविलेले बालक, महिला व पुरूषांच्या शोधासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक पोलीस पथक या कामासाठी नियुक्त केले होते. रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भिक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरविलेली मुले समजून नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याला तत्काळ माहिती कळवावी आव्हान पोलिसांनी केले होते. ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यापूर्वी पोलीस अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधीक्षक (गृह) प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक, अशासकीय संस्था, बालगृह, बालकल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष यांची बैठक घेण्यात आली होती. या मोहिमेसाठी अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस कर्मचारी एस. बी. कांबळे, ए. आर. काळे, आर. एस. म्हस्के, एस. के. घुटे, आर. एम. लोहाळे, छाया रांधवन यांनी काम केले.

……………..

तोफखाना पोलीस ठाणे अव्वल

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत जिल्हा पोलीस दलात तोफखाना पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकविले. त्यापाठोपाठ श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदे पोलीस ठाणे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले. उपविभागीय कार्यालयांमध्ये कर्जत पोलीस ठाणे अव्वल राहिले. या चार पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांचा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, ऑपरेशन मुस्कान पोलिसांना आव्हान ठरते. त्यासाठी वेगळे कौशल्य लागते. यात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा देखील बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस अधीक्षक पाटील यांनी केली.

…………….

26 जानेवारीपर्यंत ऑपरेशन सुरू

ऑपरेशन मुस्कानला जिल्ह्यात चांगले यश मिळाले आहे. पोलीस महासंचालकांनी त्याची दखल घेतली आहे. हे यश पाहून पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार 26 जानेवारीपर्यंत हे ऑपरेशन जिल्ह्यात सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. या ऑपरेशन मुस्कान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि त्याखालोखाल दोन पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

……………

शहरात विशेष मोहीम राबविणार

शहरातील प्रमुख चौकांमध्ये लहान मुले मोटारगाडीसमोर दिसतात. त्यांच्या मागे कोणीतरी असते. त्यांच्याकडून वेगवेगळी काम करून घेतात. याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील चारही पोलीस ठाण्याअंतर्गत शहरात विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ही मोहीम लवकर राबवली जाणार आहे.

…………..

- Advertisment -

ताज्या बातम्या