महापालिका राजकारणातही विखे सक्रीय

0

आगामी निवडणूक : सोशल इंजिनिअरींगचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – काही महिन्यांवर आलेल्या अहमदनगर महापालिका निवडणुकीत डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात सत्तेसाठी ताकद लावली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. महापालिका राजकारणासाठी कार्यकर्ते जोडण्याची मोहिम विखे गटाने सुरू केली असून शहराच्या राजकारणात सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सामावून घेण्याची रणनिती आखल्याचे म्हटले जात आहे.

आजवर नगर शहराच्या राजकारणात शहरातील स्थानिक नेते सक्रीय असत. त्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर आपल्या समर्थकांना बळ देण्यापलिकडे अधिक हस्तक्षेप करणे टाळत. पण अलिकडे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात आणि आता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कुटुंबातील सदस्यांना नगर शहरात थेट सक्रीय केले आहे.

विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला होता. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नगर महापालिकेवर वर्चस्वासाठी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी डाव टाकला आहे.

शहराच्या राजकारणात यापुढे विखे फॅक्टर आक्रमकपणे राजकीय मांडणी करताना दिसणार आहे. त्याची सुरूवात डॉ.विखे यांनी आधीच केली आहे. आता अन्य नेत्यांकडे नाराज असलेले आणि कामात येणारे मोहरे टिपण्याची खेळी सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आ.थोरात यांचे समर्थक मानले जाणारे धनंजय जाधव यांच्या कार्यक्रमाला डॉ.सुजय विखे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. किंबहूना या कार्यक्रमात डॉ.विखे येतील आणि त्याची चर्चा होईल, यासाठी जाधव यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. विखे अशा कार्यक्रमांचा वापर अन्य नेत्यांकडे असलेल्या कार्यकर्त्यांंना अप्रत्यक्ष संदेश देण्यासाठी करून घेत आहेत.

LEAVE A REPLY

*